काय होतं इरफानचं खरं नाव?; तो स्पेलिंगमध्ये का लिहायचा एक्स्ट्रा R?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 03:33 PM2020-04-29T15:33:00+5:302020-04-29T15:41:21+5:30

आपल्या सक्षम आणि दमदार अभिनयानं चित्रपट रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खाननं आज अखेरचा श्वास घेतला.

गेल्या तीन वर्षांपासून इरफान कर्करोगाचा सामना करत होता. काल अस्वस्थ वाटू लागल्यानं इरफान कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अवघ्या ५४ व्या वर्षी सगळ्यांच्या मनाला चटका लावून एक्झिट घेणाऱ्या इरफाननं प्रत्येक भूमिका अगदी ताकदीनं साकारली. कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय तन्मयतेनं, मन लावून उभी करणारा इरफान अनेकांना भावला.

इरफान एका राजघराण्याशी संबंधित होता. त्याचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं होतं. मात्र याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही.

इरफानला त्याचं इतकं मोठं नाव आवडायचं नाही. त्यामुळे त्यानं नावात बदल केला. याशिवाय इरफानच्या स्पेलिंगमध्ये अधिकचा आर लिहिण्यास सुरुवात केली. तो स्वत:चं नाव Irrfan असं लिहू लागला.

नावामध्ये अधिकचा आर लिहिण्यामागे काहीतरी अंकशास्त्र असावं असं अनेकांना वाटलं. मात्र यामागे कोणतंही अंकशास्त्र नव्हतं. अधिकच्या आरमुळे नाव उच्चारताना येणारा आवाज इमरानला आवडायचा.

सलाम बॉम्बे चित्रपटातून इरफान खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला.

पहिल्याच चित्रपटात इरफान खानचा सहजसुंदर अभिनय दिसून आला. या चित्रपटात त्यानं पत्र लेखकाची भूमिका साकारली. मीरा नायर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परदेशी भाषेतला सर्वोत्तम चित्रपट या विभागात सलाम बॉम्बेला नामांकन मिळालं होतं. याशिवाय देशविदेशात या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

इरफान खाननं त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. ज्यामध्ये हासिल, कसूर, पीकू, द नेमसेक, गुमनाम, रोग, लाइफ ऑफ पाय, हिंदी मीडियम, ब्लॅकमेल, कारवां, पान सिंह तोमर, करीब करीब सिंगल, स्लमडॉग मिलियनेयर यांचा समावेश आहे.

इरफाननं अनेक टीव्ही शोजमध्येही त्याचं अभिनय कौशल्य दाखवलं. छोट्या पडद्यावरही त्याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.