IN PICS : ‘शोले’ सुद्धा रिमेक आहे? हॉलिवूडची कॉपी मारलेले बॉलिवूडचे 10 सुपरहिट सिनेमे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 08:00 AM2022-08-30T08:00:00+5:302022-08-30T08:00:01+5:30

Bollywood : आमिर खानचा नुकताच रिलीज झालेला आणि दणकून आपटलेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक होता. पण ‘लाल सिंग चड्ढा’ हा पहिला रिमेक नाहीत. याआधीही अनेक हॉलिवूड चित्रपटांचे ऑफिशिअल, अनऑफिशिअल रिमेक बॉलिवूडने बनवले आहेत, त्यावर एक नजर...

बॉलिवूडमधील सर्वांत आवडत्या अशा कल्ट क्लासिक चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘शोले’ हा चित्रपट. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण शोले हा चित्रपटही एका हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. शोले हा सिनेमा 1960 मध्ये रिलीज झालेल्या ‘द मॅग्निफिशेंट सेव्हन’ नावाच्या अमेरिकन चित्रपटापासून प्रेरित आहे. आश्चर्य म्हणजे, ‘द मॅग्निफिशेंट सेव्हन’ हाही एक रिमेक आहे. तो ‘सेवन समुराई’ या जपानी चित्रपटाचा रिमेक आहे. ‘द मॅग्निफिशेंट सेव्हन’मध्ये एक गावाला दरोडेखोरांपासून वाचवण्यासाठी 7 लोकांना आणलं जातं. अर्थात शोलेमध्ये फक्त जय व वीरू ही एकच जोडी दरोडेखोरांवर भारी पडते.

1982 साली प्रदर्शित झालेला ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपटही एका हॉलिवूडपटावर आधारित आहे, यावर विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे. 1954 साली प्रदर्शित ‘सेव्हन ब्राइड्स फॉर सेव्हन ब्रदर्स’ पासून प्रेरित होऊन ‘सत्ते पे सत्ता’ हा सिनेमा बनवला गेला. अमिताभ बच्चन, हेमा मालिनीची मुख्य भूमिका असलेला ‘सत्ते पे सत्ता’ चांगलाच गाजला होता.

शाहरुख-काजोलचा ‘बाजीगर’ हा सिनेमा तुफान गाजला. यात शाहरुख निगेटीव्ह भूमिकेत होता. हा चित्रपट सुद्धा हॉलिवूडपटाचा रिमेक आहे. होय, ‘बाजीगर’ हा सिनेमा हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स डिअर डन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द किस बिफार डाइंग’ या मूळ चित्रपटावर आधारित होता.

1992 साली आलेला मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’ हा आमिर खानचा सुपरडुपर हिट सिनेमा. हा चित्रपट 1979 मध्ये आलेल्या ‘ब्रेकिंग अवे’ या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित असल्याचं बोललं जातं. ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आमिर खान, आयेशा झुल्का, दीपक तिजोरी प्रमुख भूमिकेत होते.

1994 साली आलेला ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा चित्रपट आठवतोय का? हा चित्रपट विशेष लक्षात राहिला तो ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यामुळे. सैफ अली खान, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, राजेश्वरी, कादर खान, शक्ती कपूर यांची भूमिका असलेला हा चित्रपट 1991१ सालच्या ‘द हार्ड वे’ या हॉलिवूडपटाचा अनधिकृत रिमेक आहे.

2002 साली प्रदर्शित संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काँटे’ हा चित्रपट ‘रिझर्वायर डॉग्स’ या चित्रपटावरून प्रेरित होता. या दोन्ही चित्रपटांमधील बहुतांश प्रसंग सारखेच होते. काँटे चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, महेश मांजरेकर, सुनील शेट्टी, लकी अली, कुमार गौरव इशा, कोपीकर, मालिका अरोरा आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

संजय लीला भन्साळींचा ‘ब्लॅक’ एक आयकॉनिक सिनेमा. या चित्रपटात अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1962 साली रिलीज झालेल्या ‘द मिरॅकल वर्कर’ या चित्रपटावरून प्रेरित होता. ‘ब्लॅक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज’ हा हॉरर चित्रपटही एका हॉलिवूडपटाचा रिमेक आहे. हॉलिवूडच्या ‘व्हॉट लाइज बिनेथ’ या चित्रपटाचा हा अनआॅफिशिअल रिमेक आहे. या चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया मुख्य भूमिकेत आहेत. ‘राज’ साइन करण्याआधी मी ‘व्हॉट लाइज बिनेथ' पाहिला होता, असं डिनोनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. कथेचा प्लॉट आणि त्यामधील काही प्रसंग जवळपास सारखेच आहेत.

2007 सालचा निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘सलाम-ए-इश्क’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘लव्ह अ‍ॅक्चुली’ या, चित्रपटावरून प्रेरित होता. या चित्रपटात सलमान खान, गोविंदा, अनिल कपूर, जुही चावला, अक्षय खन्ना, विद्या बालन महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

1989 साली रिलीज झालेला ‘व्हेन हेरी मेट सेली’ हा हॉलिवूड सिनेमा चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या रिलीजच्या सुमारे 15 वर्षानंतर ‘हम तुम’ रिलीज झाला होता. सैफ अली खान व राणी मुखर्जीच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा ‘व्हेन हेरी मेट सेली’चा रिमेक होता.