बॉलिवूडनं नाकारलं, पण आजही बांगलादेशचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो 'हा' अभिनेता!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:55 PM2024-08-06T16:55:02+5:302024-08-06T17:46:32+5:30

बॉलिवूडने नाकारल्यानंतर या अभिनेत्यानं बांगलादेशी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि तिथं रातोरात सुपरस्टार झाला.

बांगलादेशमध्ये अभूतपूर्व अशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या देशाकडे लागल्या आहेत.

पण, तुम्हाला माहितेय असा एक अभिनेता आहे, ज्याला बांगलादेशातील लोकांनी भरभरुन प्रेम दिलं. तो अभिनेता बांगलादेशाचा अमिताभ बच्चन म्हणूनही ओळखला जायचा.

तो अभिनेता म्हणजे चंकी पांडे. एक काळ होता, जेव्हा बांगलादेशने चंकी पांडेला सुपरस्टार बनवले होते. भारतात नाही मिळालं, तेवढं यश चंकी पांडेला बांगलादेशात मिळालं होतं.

चंकी पांडेचे खरे नाव सुयश पांडे असं आहे. २६ सप्टेंबर १९६२ रोजी जन्मलेल्या चंकी पांडेने १०० हून अधिक चित्रपट केले आहेत. पण, बॉलिवूडमध्ये त्याचा प्रवास सोपा नव्हता. १९८७-१९९४ मध्ये चंकी पांडेचे सिनेमे बॅक टू बॅक फ्लॉप झाले होते. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की त्याच बॉलिवूडमधील करिअर धोक्यात आलं होतं.

चंकी पांडेच्या कुटुंबाचा बॉलिवूड किंवा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. चंकी पांडेचे वडील हे शरद पांडे हार्ट सर्जन होते. त्यांनी आपल्या क्षेत्रात खूप नाव कमावले होतं. चंकीचे वडील हे हृदय प्रत्यारोपण करणारे भारतामधील पहिले सर्जन होते. चंकी पांडेच्या आईचे नाव स्नेहलता पांडे असे होते. त्याही एक डॉक्टर, फिजिशियन आणि आहारतज्ज्ञ होत्या. चंकी पांडेला एक भाऊ देखील आहे, ज्याचे नाव चिक्की पांडे आहे.

चंकी पांडेची पत्नी भावना पांडेबद्दल बोलायचं झालं तर ती कॉस्टयूम डिझायनर आहे. चंकी आणि भावना यांना अनन्या पांडे आणि रिसा पांडे या दोन मुली आहेत. अनन्याने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली असून ती एक आघाडीची अभिनेत्री बनली आहे.

चंकी पांडेने बॉलिवूडमध्ये 'आग ही आग' या मल्टीस्टार चित्रपटातून पदार्पण केलं. अनिल कपूरच्या 'तेजाब' मध्ये सहाय्यक भूमिका साकारली. याशिवाय 'आँखें' हा सुपरहिट चित्रपट दिला. पण, चंकी पाडेवर अशीही वेळ आली, जेव्हा त्याच्याकडे काहीच काम नव्हते. या परीस्थितीत 1995 मध्ये चंकी पांडेने बॉलिवूडऐवजी बांगलादेशी सिनेमात पदार्पण केले. तिथे तो सुपरस्टार झाला.

आउटलुकला दिलेल्या मुलाखतीत खुद्द चंकी पांडेने बांगलादेशला जाण्याचे कारण सांगितले होते. 33 वर्षांच्या कारकिर्दीत चांगले आणि वाईट असे दोन्ही काळ पाहिले असल्याचे त्याने सांगितले. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने बांगलादेशला जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांने सांगितले.

चंकी पांडेने 'स्वामी केनो आसामी', 'बेश कोरेची प्रेम कोरेची' अशा ६ बांगलादेशी चित्रपटांमध्ये काम केले. स्थानिक भाषा येत नसतानाही मोठी मेहनत घेत त्याने यश मिळवलं.

1997 ते 2002 पर्यंत चंकी पांडेला बॉलिवूडमध्ये खूप कमी बजेटचे चित्रपट ऑफर केले जात होते. मात्र, घरी बसण्याऐवजी त्याने या सर्व आव्हानांचा सामना केला. शेवटी, 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केलं, डॉन, मुंबई से आ गया मेरा दोस्त, अपना सपना मनी मनी आणि हाऊसफुल या चित्रपटांमध्ये त्याने काम केले.

अभिनेता चंकी पांडे यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. चंकी पांडे यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. ‘पास्ता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंकी पांडेने आपल्या कारकिर्दीत विनोदी तसेच नकारात्मक पात्र देखील साकारली आहेत.