गॅरेजमध्ये काम करणारा मुलगा ते बॉलिवूडचा 'ही मॅन'; 'या' अभिनेत्याचा स्ट्रगल आहे प्रेरणादायी By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:54 PM 2023-12-08T14:54:22+5:30 2023-12-08T15:00:30+5:30
मनोरंजन विश्वात पाऊल ठेवण्याआधी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अभिनेते धर्मेंद्र यांना गॅरेजमध्ये काम करावे लागत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास... हिंदी मनोरंजन विश्वात आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या धडाकेबाज अभिनयाने धर्मेंद्र यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली.
पण एकेकाळी या अभिनेत्याने त्याच्या संघर्षाच्या काळात गॅरेजमध्ये काम केले होते. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर धर्मेंद्र यांनी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.
आज ८ डिसेंबरला अभिनेते धर्मेंद त्यांचा ८८ वा वाढदिवस साजरा करतायत. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी लुधियानामधील एका गावात झाला.अगदी लहानपणापासून धर्मेंद यांना चित्रपटांचे वेड होते. केवळ चित्रपट पाहण्यासाठी अनेकदा त्याच्या घरच्यांचा डोळा चुकवून धर्मेंद्र चोरून चित्रपट पाहायचे, असे ते सांगतात.
धर्मेंद्र यांना बालपणापासून अभिनयाची रुची होते. अभिनय विश्वात आपले नशीब अजमावण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवण्याआधी धर्मेंद्र यांनी गॅरेजमध्ये काम केले. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला.
१९६० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यामुळे आजही एक एव्हरग्रीन अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत शोले हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले.
आजही वयाच्या उत्तरार्धात धर्मेंद्र अभिनय क्षेत्रात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच प्रदर्शित झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या हिंदी सिनेमामुळे ते प्रकाशझोतात आले होते. दमदार अभिनय आणि त्याला वास्तविकतेची जोड देत प्रेक्षकांच्या मनात धर्मेंद्र यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे