'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल दिया मिर्झाने दाखवली नाराजी, म्हणाली, 'आज जर ऑफर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:19 PM2023-04-07T16:19:17+5:302023-04-07T16:24:53+5:30

दिया मिर्झा आणि आर माधवनचा सुपरहिट सिनेमा 'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल हे काय बोलली अभिनेत्री

2001 साली आलेला 'रहना है तेरे दिल मे'(Rehna Hai Tere Dil Mein) म्हणजे आजही तरुण वर्गाचा आवडता चित्रपट. यामध्ये आर माधवनने (R Madhvan) 'मॅडी' या तरुणाची तर दिया मिर्झाने (Diya Mirza) 'रीना'ची भूमिका साकारली होती. तर सैफ अली खान 'राजीव' च्या भूमिकेत दिसला.

सिनेमाची स्टोरी तर जबरदस्त होतीच पण यातील गाणी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. प्रेमाचं गाणं असो, मैत्रीचं गाणं असो किंवा विरहाचं गाणं असो प्रत्येक गाणं तरुणांना आपलंसं वाटलं. आजही सिनेमातील गाणी हमखास कुठे ना कुठे लावलेली असतात.

सिनेमात मॅडी स्वत:ची खरी ओळख लपवून रीनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. रीनाही त्याच्या प्रेमात पडते. मॅडीचं प्रेम तर खरं असतं पण त्याने नात्याची सुरुवातच खोटेपणातून केली असते. नंतर रिना समोर सगळं सत्य आल्यानंतर ती त्याच्यापासून दूर जाते. मात्र तरी दोघांचं प्रेम खरं असल्याने रीना त्याला माफ करते आणि दोघं पुन्हा सोबत येतात.

या सुपरहिट सिनेमाबद्दल आता अभिनेत्री दिया मिर्झाने मात्र नाराजी दर्शवली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिया म्हणाली,'जर आज ही फिल्म मला ऑफर झाली असती तर मी नक्कीच सिनेमाच्या काही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केला असता. मला आशा आहे की लेखकाने ते बदल केले असते.

दिया असं का म्हणाली? कारण ती सांगते,'मी फिल्म जेव्हा आजच्या काळात पुन्हा बघते तेव्हा मला जाणवतं की यामध्ये प्रेमाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलंय. कोणाचाही पाठलाग करण्याच्या मी विरोधात आहे आणि यामध्ये मॅडी केवळ तिचा पाठलाग करत नाही तर तिच्याशी खोटंही बोलतो. तिला खरं समजतं तेव्हा ती नातं तोडते.'

दिया म्हणाली,'खोटं बोलणं तर चुकीचं आहे आणि पाठलाग करणं तर त्याहून जास्त वाईट. मला माहितीए आताही असे काही सिनेमे बनले आहेत ज्यात असंच काहीसं दाखवण्यात आलंय. ते सिनेमे बॉक्सऑफिसवर हिट झालेत. मला वाटतं समाजाच्या दृष्टीने पाठलाग करणं चुकीचंच आहे. अशा फिल्म खोटं परसवण्यासाठी जबाबदार असतात.

सिनेमा म्हणजे समाजाचा आरसा आहे. त्यामुळे सिनेमात जे घडतं त्याचं अनुकरण अनेक जण खऱ्या आयुष्यात करतात. यामुळे अनेकदा अनुचित प्रकारही घडतात. याचंच भान राखत दिया मिर्झाने तिच्याच जुन्या चित्रपटाबद्दल हे वक्तव्य केलं आहे.