दिव्या भारतीच्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच अभिनेत्री तोडू शकली नाही तिचा हा रेकॉर्ड By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:55 AM 2024-09-19T11:55:22+5:30 2024-09-19T12:02:18+5:30
Divya Bharti : दिव्या भारतीच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. नव्वदच्या दशकात जिथे जुही चावला पासून माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन या अभिनेत्री लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते होते. तेव्हा एका नवोदित अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री करून धुमाकूळ घातला होता. ही अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. आजही या अभिनेत्रीचे लोकांच्या मनातील घर कायम आहे.
दिव्या भारतीने १९९० साली तेलगू सिनेमा बोब्बिली राजामधून अभिनयाच्या जगात पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि ती साउथ सिनेइंडस्ट्रीची स्टार बनली. जेव्हा ती नववी इयत्तेत होती तेव्हा तिला सिनेमा आणि मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या होत्या.
दिव्या भारतीने त्यानंतर तमीळ भाषेच्या सिनेमात काम केले. त्यानंतर १९९२ साली तिने विश्वात्मा सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पहिल्याच सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला.
निर्माते, दिग्दर्शकांपासून इतर अभिनेत्री दिव्या भारतीचे टॅलेंट पाहून हैराण झाले होते. तिच्यावर चित्रीत झालेले गाणे सात समंदर पार हे गाणे आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात आणि त्यावर थिरकतात.
दिव्या भारतीकडे सिनेमांच्या ऑफर्सची रांग लागली होती. तिची निरागसता आणि अभिनयाशिवाय तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते. दिव्या भारतीचे अभ्यासात मन लागत नव्हते आणि याच कारणांमुळे तिने इयत्ता नववीत शाळा सोडली.
अभ्यासासाठी दूर पळण्यासाठी ती अभिनयात आली. वयाच्या १४व्या वर्षी दिव्या भारतीने मॉडेलिंग सुरू केले होते. त्यानंतर ती सिनेमात आली आणि प्रसिद्धीझोतात आली होती.
दिव्या भारतीचे निधन ५ एप्रिल, १९९३ला निधन झाले. तिच्या मृत्यूचे गुढ आजही कायम आहे. ती सिनेक्षेत्रात फक्त तीन वर्षच काम करू शकली. पण तिने तीन वर्षांत असे यश मिळविले होते, जे आजपर्यंत कोणतीच अभिनेत्री मिळवू शकली नाही.
दिव्या भारतीने तीन वर्षात जेवढ्या सिनेमात काम केले त्यातील जास्त चित्रपट हिट ठरले. तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिव्या भारतीने २० सिनेमात काम केले होते.
१९९२ साली दिव्या भारतीने जो रेकॉर्ड बनवला, तो आजही कायम आहे. या वर्षात तिने १२ सिनेमात काम केले. तिचा हा रेकॉर्ड मागील ३१ वर्षांत कोणतीच जुन्या आणि नवीन अभिनेत्री मोडू शकली नाही. या १२ चित्रपटांमध्ये 'दिल का क्या कसूर', 'विश्वात्मा', 'शोला और शबनम', 'दीवाना', 'बलवान', दुश्मन जमाना', 'दिल आशना है' आणि 'गीत' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
दिव्या भारतीचे जवळपास १२ असे चित्रपट होते, जे तिच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिले होते. यातील काही चित्रपट इतर अभिनेत्रींना साईन करून पूर्ण करण्यात आले आणि मग ते रिलीज करण्यात आले. करिश्मा कपूर, श्रीदेवी, रवीना टंडन, काजोल आणि पूजा भट या अभिनेत्रींनी तिच्या अपूर्ण राहिलेल्या सिनेमात काम केले होते.