वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीत चौधरीनं खूप काही सोसलं...!! By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:39 PM 2022-02-22T12:39:13+5:30 2022-02-22T12:50:02+5:30
Gurmeet Choudhary Birthday : अभिनेता गुरमीत चौधरी टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा. आजही त्याला टीव्हीवरचा राम म्हणूनच लोक ओळखतात. आज गुरमीतचा वाढदिवस. आज तो 37 वर्षांचा झाला. अभिनेता गुरमीत चौधरी टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा. आजही त्याला टीव्हीवरचा राम म्हणूनच लोक ओळखतात. आज गुरमीतचा वाढदिवस. आज तो 37 वर्षांचा झाला.
गुरमीतने टीव्हीपासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास यशस्वी पूर्ण केला. पण हा प्रवास खचितच सोपा नव्हता. यामागे संघर्षाची मोठी कहाणी आहे. मोठ्या स्ट्रगलनंतर बालपणीचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.
लहानपणापासूनच गुरमीतला अभिनयात करिअर करायचं होतं. हे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला. पण मुंबईत स्वप्न घेऊन येणं वेगळं आणि ते पूर्ण करणं वेगळं. इथून त्याचा संघर्ष सुरू झाला.
अॅक्टर बनण्याआधी गुरमीत मॉडेलिंग करायचा. मुंबईत आल्यावर जवळचे पैसे किती दिवस पुरणार? अखेर पैशांसाठी त्याने एका स्टोरमध्ये वॉचमनची नोकरी पत्करली. नोकरीतून काही हजार मिळायचे आणि उरलेले मॉडेलिंगमधून जमायचे. आज याच गुरमीतची फी लाखो रूपयांत आहे.
‘रामायण’ ही मालिका मिळण्याआधी 3 वर्ष गुरमीतकडे काम नव्हतं, ना पैसे. याकाळात तो स्वत:च स्वत:साठी जेवण बनवायचा. पण ‘रामायण’ ही मालिका मिळाली आणि त्याचं नशीब बदललं. पण तेवढ्यापुरतंच.
‘रामायण’ या मालिकेनंतर पुन्हा गुरमीतला कोणी काम देईना. अखेर 2011 मध्ये त्याला त्याच्या करिअरमधला पहिला ब्रेक मिळाला. गीत या मालिकेत त्याला लीड रोल मिळाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
रामायण याच मालिकेच्या सेटवर त्याला त्याचं प्रेम मिळालं. देबिना बॅनर्जी व त्याची ओळख झाली. या मालिकेत देबिनाने सीतेची भूमिका साकारली होती. पुढे दोघंही प्रेमात पडले आणि नंतर या कपलनं लग्न केलं.
टीव्हीवर सलग तीन वर्ष काम केल्यानंतर गुरमीतला मोठा पडदा खूणावू लागला होता. पण इथेही स्ट्रगल होताच. तू टीव्ही स्टार आहेस, लोक तुला टीव्हीवर फुकटात बघतात, मोठ्या पडद्यावर पैसे देऊन तुला कोण बघायल येईल, असे टोमणे त्याने सहन केले. पण तो मागे हटला नाही.
खामोशियां, वजह तुम हो, पलटण अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत त्याने भूमिका साकारल्या. आज गुरमीतकडे सगळं आहे. पण करिअरच्या सुरूवातीला केलेला संघर्ष तो विसरलेला नाही. कदाचित म्हणूनच त्याचे पाय जमिनीवर आहेत.