इरफान खानच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रमंडळींनी रुग्णालयात घेतली धाव, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:05 PM2020-04-29T17:05:46+5:302020-04-29T17:27:47+5:30

बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.

दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रुग्णालयासमोर गर्दी केली.

काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले.

काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला जयपूरमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर काल इरफानची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

वर्सोवा येथील दफनभूमीत अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत इरफानच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

इरफानच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला चांगलाच धक्का बसला असून बॉलिवूडमधील अनेकांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने तिग्मांशू धुलिया आणि विशाल भारद्वाज याच बॉलिवूडमधील मंडळींना इरफानच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घ्यायला मिळाले.