Kajol : “लोक मला 'काली', 'मोटी' म्हणायचे आणि आता...”; काजोल स्पष्टच बोललेली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:34 AM2023-04-13T10:34:49+5:302023-04-13T10:42:32+5:30

Kajol : इंडस्ट्रीत आली तेव्हा काजोल बरीच सावळी होती. यानंतर काही वर्षांनी ती इतकी उजळली की, तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता...

काजोल (Kajol )आताश: मोजके सिनेमे करते. पण तिची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. वयाच्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या काजोलचा बाजीगर हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

सोशल मीडियावर काजाेल प्रचंड ॲक्टीव्ह आहे. साहजिकच सोशल मीडिया म्हटलं की, ट्रोल होणं आलंच. या ना त्या कारणावरू काजोलला सुद्धा ट्रोल केलं जातं. त्याआधीही रंगरूपावरून तिला बरेच टोमणे ऐकावे लागलेत.

एका चॅट शोमध्ये काजोल यावर बोलली होती. गेल्या काही वर्षांत काजोल प्रचंड बदलली आहे. पण करिअरच्या सुरूवातीच्या काळात रंगरूपावरून ऐकावे लागलेले टोमणे, टीका यावर तिने भाष्य केलं होतं.

ती म्हणाली होती, “बॉलिवूडमध्ये आले तेव्हा लोक मला डार्क आणि फॅट म्हणायचे. मी कायम चष्मा घालायचे, त्यावरुनही मला डिवचलं जायचं. पण मला या गोष्टींचा ताण कधीच जाणवला नाही. कारण, मी शांत, हुशार आहे तसंच जे माझ्याबद्दल नकारात्मक टीका करतात त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगली आहे, हे मला माहित होतं. ”

“मला माझ्या रंगावरुन अनेक नकारात्मक गोष्टी सहन कराव्या लागल्या. मी खरंच खूप सुंदर होते. मी ३२-३३ वर्षांची असताना आरशात पाहायला सुरुवात केली आणि त्यानंतर तू जशी आहेस तशीच खूप सुंदर दिसते, असं मी स्वत:ला सांगितलं. त्यामुळे मी जशी होते, तशीच राहिले.”, असंही ती म्हणाली होती.

इंडस्ट्रीत आली तेव्हा काजोल बरीच सावळी होती. यानंतर काही वर्षांनी ती इतकी उजळली की, तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काजोलने स्कीन लाइटनिंग सर्जरी केल्याचा दावा अनेकांनी केला होता. यावरही ती या मुलाखतीत बोलली होती.

२०१४ मध्ये पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने अशी कुठलीही सर्जरी केल्याचं नाकारलं होतं. मी कोणतीही सर्जरी केलेली नाही, कुठलीही स्कीन व्हायटनिंग ट्रिटमेंट घेतलेली नाही, असं तिने ठामपणे सांगितलं होतं.

“मी कोणतही स्कीन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही. मी फक्त उन्हापासून दूर राहते. सुरूवातीला सलग १० वर्ष मी उन्हात काम केलं. मी माझ्या स्कीनची अजिबात काळजी घेतली नाही. त्यामुळे मी टॅन झाले होते. पण यानंतर मी उन्हात काम करणं पूर्णपणे बंद केलं आणि मी अनटॅन्ड झाले,”असं तिने सांगितलं होतं.

काजोलने ३१ वर्षांपूर्वी १९९२ साली बेखुदी या सिनेमातून अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं होतं. तेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती.

१९९३ साली तिचा बाजीगर सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा तुफान चालला. शाहरूखसोबतची तिची केमिस्ट्री हिट ठरली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.