Madhubala: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जन्माला आली, पण आयुष्यभर प्रेमासाठी झुरत राहिली मधुबाला! By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:11 AM 2023-02-14T10:11:56+5:30 2023-02-14T10:21:32+5:30
Madhubala Love Life : पहिल्याच सिनेमानंतर मधुबालाने राजकपूरसोबत 'दिल की रानी' आणि 'अमर प्रेम'सारखे सिनेमे केले. मधुबालाचं सुंदर हसणं प्रेक्षकांच्या मनाला हात घालत होतं. मनोरंजन विश्वाच्या जुन्या दिवसांचा विषय निघाला तर हा विषय मधुबालाचं नाव घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही. आजही तिचा हसता आणि सुंदर चेहरा लोकांच्या मनात आहे. आपल्या चंचल अदांमुळे मधुबालाने बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान तयार केलं होतं. ती इतकी सुंदर होती की, आजच्या हिरोईन तिच्यासमोर पाणी भरतात. पण पडद्यावर आनंदी दिसणारी मधुबाला खाजगी आयुष्यात खूप त्रासात होती.
मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 ला झाला होता. दिल्लीतील पश्तून मुस्लिम परिवारात तिचा जन्म झाला होता. तर तिच्या करिअरची सुरूवात 1942 मध्ये बालकलाकार म्हणून बसंत सिनेमातून झाली होती. एक हिरोईन म्हणून तिने 1947 साली आलेल्या नीलकमलपासून सुरूवात केली होती.
पहिल्याच सिनेमानंतर मधुबालाने राजकपूरसोबत 'दिल की रानी' आणि 'अमर प्रेम'सारखे सिनेमे केले. मधुबालाचं सुंदर हसणं प्रेक्षकांच्या मनाला हात घालत होतं. लोक तिला पसंत करू लागले होते. मधुबालाचं खरं नाव मुमताज बेगम जहां देहलवी होतं.
'पराई आग', 'पारस', 'सिंगार', 'दुलारी', 'बेकसूर', 'आंसू', 'मि. एंड मिसेज 55', 'बादल' अशा अनेक सिनेमातून मधुबालाने वेगळी ओळख तयार केली. खासकरून दिलीप कुमारसोबतचा तिचा 'मुगल ए आजम' खूप गाजला होता. यातील तिची अनारकलीची भूमिका अजरामर झाली.
सिनेमा सोडून मधुबाला खऱ्या आयुष्यात अनेकदा प्रेमात पडली. सगळ्यात आधी ती सह कलाकार प्रेमनाथच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांच्यासोबत तिचं अफेअर 9 वर्ष चाललं. दोघांची पहिली भेट तराना सिनेमाच्या सेटवर झाली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण दोघाच्याही जिद्दीमुळे ते एक होऊ शकले नाही. शूटींग लोकेशनबाबत मधुबालाचे वडील कोर्टात गेले होते. तेव्हा दिलीप कुमार यांनी डायरेक्टरला साथ दिली होती. यामुळे मधुबाला नाराज झाली होती. तिची ईच्छा होती की, दिलीप कुमार यांनी तिच्या वडिलांची माफी मागावी. ते दिलीप यांची ईच्छा होती की, मधुबालाने वडिलांना सोडून त्यांच्याकडे यावं.
दिलीप कुमार आणि मधुबाला यांची ही प्रेम कहाणी इथेच संपली. असं म्हटलं जातं की, नंतर तिने फार लवकर किशोर कुमारला आपल्या आयुष्यात जागा दिली. मधुबाला आजारी होती आणि तिला उपचारासाठी लंडनला जायचं होतं. पण त्याआधी 27 वर्षांची असताना 16 ऑक्टोबर 1960 ला तिने किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केलं.
लग्नानंतर मधुबाला आणि किशोर कुमार उपचारासाठी लंडनला गेले. पण तिचं ऑपरेशन होऊ शकलं नाही. दोघेही परत मुंबईला आले. काही महिन्यांनी त्यांच्या भांडणं सुरू झाली होती. त्यानंतर ती किशोर कुमार यांच्या बांद्रा येथील घरात शिफ्ट झाली. हळूहळू किशोर कुमार यांनी मधुबाला भेटणं कमी केलं.
मधुबालाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सोबतच किशोर यांच्यासोबतचं तिचं नातंही कमजोर होत चाललं होतं. 1966 मध्ये मधुबालाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण तब्येतीने तिची साथ दिली नाही. दुसरीकडे किशोर कुमार यांनी तिला भेटणंही बंद केलं होतं.
शेवटच्या दिवसांमध्ये तिची तब्येत खूप बिघडली होती. सोबतच तिला याचं वाईट वाटत होतं की, कुणी तिला भेटायलाही येत नाही. मधुबालाने सजणंही सोडलं होतं. ती केवळ गाउन घालत होती. प्रेमाच्या दिवशी म्हणजे व्हलेंटाईन डे च्या दिवशी जन्माला आलेली मधुबाला प्रेमासाठी आयुष्यभर झुरत राहिली आणि शेवटी 23 फेब्रुवारी 1969 ला तिने जगाचा निरोप घेतला.