Joyland :पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आधी चित्रपट ऑस्करला पाठवला, नंतर स्वत:च्याच देशात घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:03 PM2022-11-15T17:03:40+5:302022-11-15T17:47:46+5:30

Joyland पाकिस्तानमधून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश केलेला पहिला सिनेमा ठरला. मात्र, आता त्यांच्याच देशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानी चित्रपट 'जॉयलँड' (Joyland) बाबत देशात बराच वाद झाला आहे. हा चित्रपटनं पाकिस्तानकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश होता. मात्र, आता पाकिस्तानमध्येच त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

'जॉयलँड' 18 नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होणार होता पण पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने त्यावर बंदी घातली.

या चित्रपटाचा ट्रेलर 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. याशिवाय पाकिस्तानातून ऑस्करसाठी पाठवलेला जॉयलँड हा पहिला चित्रपट ठरला आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलसह इतर अनेक परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. जॉयलँडचे समीक्षकांनी कौतुक केले आणि परदेशात अनेक पुरस्कार जिंकले.

17 ऑगस्ट रोजी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रमाणपत्र दिले होते, मात्र त्यानंतर अचानक पाकिस्तानने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावर बंदी घातली होती.

'जॉयलँड'च्या बोल्ड कंटेंटबद्दल शेजारच्या देशात निदर्शने होत होती, त्यानंतर मंत्रालयाने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाबाबत नोटीस जारी करताना म्हटले आहे की, 'चित्रपटात अत्यंत आक्षेपार्ह गोष्टी असल्याच्या लेखी तक्रारी आल्या होत्या, ज्या आपल्या समाजातील मूल्यांशी सुसंगत नाहीत.'

चित्रपटाची अभिनेत्री सरवत गिलानीने या निर्णयावर टीका करत संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणाबाबत अभिनेत्रीने ट्विट करून लिहिले की, '६ वर्षांत २०० पाकिस्तानी लोकांनी एक चित्रपट बनवला ज्याला टोरंटोपासून कैरो आणि कान्सपर्यंत स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. आता त्याला त्याच्याच देशात रोखले जात आहे, हे लज्जास्पद आहे... देशाचा हा अभिमानाचा क्षण हिरावून घेऊ नका.'