Poonam Dhillon Birthday Special : पूनम ढिल्लोन यांनी ‘हे’ एकच स्वप्नं बघितलं होतं पण नियतीला काही वेगळं मंजूर होतं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:00 AM2022-04-18T08:00:00+5:302022-04-18T08:00:02+5:30

Poonam Dhillon Birthday Special : सौंदर्य आणि अदाकारी या जोरावर भारतीय सिनेप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. आज (18 एप्रिल) पूनम ढिल्लोन यांचा वाढदिवस.

सौंदर्य आणि अदाकारी या जोरावर भारतीय सिनेप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. आज (18 एप्रिल) पूनम ढिल्लोन यांचा वाढदिवस.

18 एप्रिल 1962 रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनम यांनी 1977 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आणि अचानक प्रसिद्धी झोतात आल्या.

पुढे एका मॅगझिनमध्ये पूनम यांचं छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना ‘त्रिशुल’ सिनेमाची ऑफर दिली. आधी पूनम यांची ही ऑफर नाकारली. पण नंतर या चित्रपटाला होकार कळवला. तोपर्यंत पूनम यांनी अभिनेत्री बनण्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.

पूनम यांनी सुरुवातीला ‘त्रिशुल’ ला नकार दिला. यामागे एक खास कारण होतं. हे कारण म्हणजे, एका सामान्य मुलीप्रमाणे त्यांनी पाहिलेलं स्वप्न. होय, पूनम यांना कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तसा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता.

कारण त्यांचं स्वप्न काही वेगळंच होतं. लहानपणापासून पूनम यांना बायोलॉजीत गती होती. याचमुळे पूनम यांना डॉक्टर बनायचं होतं. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. पूनम यांच्या भावाने नकार दिला आणि त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न भंगले.

डॉक्टर बनण्याचं स्वप्न भंगल्यानं पूनम हिरमुसल्या. पण यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचं ठरवलं. अगदी यासाठी दिवसरात्र नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. पण मॅगझिनमध्ये छापून आलेल्या एका फोटोने त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली.

यश चोप्रा ‘त्रिशुल’ची ऑफर घेऊन आलेत तेव्हा पूनमने नकार दिला होता. यावेळी त्यांचे कौटुंबिक मित्र बलवंत गार्गी यांनी पूनम यांना समजावलं.

बलवंत गार्गी हे पंजाब विद्यापीठात ड्रामेस्टिक विभागाचे प्रमुख होते. तुला अभ्यास करायचा तर कर. पण सुट्टीच्या दिवसांत तू चित्रपट करू शकतेस, असे ऐनकेन प्रकारे त्यांनी पूनमची समजूत काढली. सुट्टीत अभिनय करण्याचा गार्गी यांचा सल्ला पूनम आणि तिच्या कुटुंबाला मानवला आणि त्यांनी यश चोप्रांच्या ‘त्रिशुल’ला होकार दिला.

‘त्रिशुल’ या पहिल्याच चित्रपटात पूनम यांना अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि संजीव कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि याचसोबत पूनम ढिल्लोन यांनी पूर्णवेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला.

पुढे महानता, कुबार्नी, पत्थर के इन्सान, साया, नुरी, सोनी माहिवाल अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं.

1988 मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केलं. पूनम यांना पाहताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले होते. पूनम यांचा होकार मिळेपर्यंत दररोज ते त्यांना एक गुलाबाचं फूल पाठवत होते.

अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनम यांनी सिनेमात काम करणं कमी केलं. पूनम-अशोक यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झालीत. पण दुर्दैवानं त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 1997 मध्ये अशोक आणि पूनम यांचा घटस्फोट झाला.