Rajinikanth Birthday: बस कंडक्टर ते दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, असे आहे रजनीकांत यांचे प्रेरणादायी आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 10:58 AM 2021-12-12T10:58:50+5:30 2021-12-12T11:02:27+5:30
Rajinikanth Birthday: रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीत सुपरस्टार अशी ओळख आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतासह जगभर रजनीकांत यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. आज त्यांचा 71वा वाढदिवस आहे. आज सुपरस्टार रजनीकांत यांचा 71 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांना ओळख नाही, असा कोणी आपल्याला सापडणार नाही. आपल्या अभिनय कौशल्याच्या आणि आगळ्यावेगळ्या अॅक्शन स्टाइलच्या जोरावर रजनीकांत यांनी भारतासह जगभर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी फक्त तामिळच नाही, तर हिंदीसह अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. आज सोशल मीडियावर #HBDSuperstarRajinikanth हे ट्रेंड करत आहे. या निमित्ताने रजनीकांत यांच्या एका प्रेरणादायी आयुष्यावर नजर टाकूया.
शिवाजी राव हे रजनीकांत यांचे खरे नाव असून सिनेमात येण्यापूर्वी ते बंगळुरूमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत होते. दिग्दर्शक के बालचंदरने शिवाजी राव यांना बंगळुरूच्या भेटीत पाहिले आणि त्यांना त्यांच्या चित्रपटात संधी दिली. त्यांनीच शिवाजी राव यांना रजनीकांत बनण्यास प्रेरित केले. 'अपूर्व रागंगल' या चित्रपटाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
रजनीकांत सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी तयार होते आणि काही चित्रपटांमध्ये ते नकारात्मक भूमिकेतही दिसले. त्यांना चित्रपटातील आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीमुळे मुख्य अभिनेत्याच्या ऑफर येऊ लागल्या. मुख्य अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
दक्षिणेतील चाहत्यांची मने जिंकल्यानंतर रजनीकांतने आपल्या हिंदी चित्रपटांतून उत्तर भारतीय चाहत्यांनाही प्रभावित केले. रजनीकांतने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. रजनीकांत यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉक्स ऑफिसवर रजनीकांतच्या चित्रपटाच्या सततच्या यशाने त्यांना एक बँकेबल(पैसे कमावून देणारे) स्टार बनवले. हे सातत्य त्यांचे आजही सुरूच आहे. आजही त्यांचा चित्रपट आल्यावर चाहते त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी वेड्यासारखी गर्दी करतात. त्यांनी बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले आहेत.
रजनीकांत यांचे चित्रपट केवळ दक्षिणेतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही ब्लॉकबस्टर ठरले आहेत. रजनीकांत यांनी 70 च्या दशकात सुरू केलेला यशाची मालिका आजही सुरू आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'अन्नाथे' चित्रपट खूप यशस्वी झाला असून, चाहत्यांनी चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे त्यांना भारत सरकारने यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार दिला आहे. मूळात थलैवाच्या अभिनयाला पुरस्कारांची गरज नाही, कारण प्रेक्षक त्यांच्या शैलीचे वेड आहेत. मात्र, त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत.