रितेशला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी सुरु झाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 01:42 PM2023-12-17T13:42:27+5:302023-12-17T13:49:27+5:30

रितेश देशमुखचा आज 45 वा वाढदिवस

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) मराठी हिंदी मनोरंजनसृ्ष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. व्हिलन असो किंवा रोमँटिक असो किंवा मग विनोदी अशी कोणतीही भूमिका तो चोख निभावतो. आज रितेश 45 वा वाढदिवस साजरा करत आहे.

रितेश आणि जिनिलिया (Genelia) ही मनोरंजनसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. आधी काही वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघंही 2012 साली लग्नबंधनात अडकले. त्यांच्या संसाराला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अजूनही ही जोडी आपल्याला प्रेमात पाडते.

2003 साली आलेल्या 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या शूटवेळी त्यांच्यात मैत्री झाली. यामध्ये दोघंही मुख्य भूमिकेत होते. तेव्हा रितेश यांचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सिनेमाच्या लूक टेस्टनिमित्त रितेश हैदराबादला गेला तेव्हाच जिनिलिया तिच्या आईसोबत तिथे आली होती

रितेशला पाहताच जिनिलियाने त्याच्याकडे आधी दुर्लक्ष केले. रितेशलाही कळलं नाही की मुलगी इग्नोर का करत आहे. तेव्हा जिनिलिया म्हणाली की सिनेमाच्या शूटच्या दोन दिवस आधीच तिला रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे ही गोष्ट समजली. त्यामुळे रितेश नक्कीच बिघडलेला असेल असा तिचा समज झाला.

जिनिलियाला वाटलं रितेश तिला अॅटिट्यूड दाखवेल त्याच्या आधी तिनेच त्याला अॅटिट्यूड दाखवला. आजही दोघं त्यांच्या भेटीचा हा किस्सा सांगतात तेव्हा सर्वांना तितकंच हसू येतं.

नुकताच रितेश-जिनिलियाने 'वेड' हा मराठी ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिला. सैराट नंतर सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरला. यातील रितेश जिनिलियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ऑफस्क्रीन सारखीच सुरेख दिसली.

रितेश जिनिलिया यांना रिआन आणि राहील ही दोन मुलं आहेत. दोघांनाही रितेशने दिलेले संस्कार पाहून महाराष्ट्रातील जनतेला त्यांचं कौतुक वाटतं. संपूर्ण महाराष्ट्र रितेशला दादा तर जिनिलियाला वहिनी म्हणतात.