पाताल लोक २ मध्ये दिसणारं हे हॉटेल नागालँडमध्ये नाहीच; जाणून घ्या या ऐतिहासिक निवासस्थानबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:21 IST2025-01-30T20:13:19+5:302025-01-30T20:21:22+5:30

पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भेटीला आलेला पाताल लोकचा दुसरा सीझन अप्रतिम कथेसह प्रेक्षकांना नागालँडला घेऊन गेला.

नागालँड, ज्याला मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अनेकदा दुर्लक्षित केले जाते ते पाताल लोक सीझन दोनमुळे नव्याने ओळखलं जात आहे. कोहिमाच्या गूढ दऱ्या, धुक्याने झाकलेली निर्जन खेडी प्रेक्षकांनी आकर्षित करत आहेत. मात्र पाताल लोकमधील अनेक ठिकाणांचे शूट हे नागालँडमध्ये झालेलं नाही

'पाताल लोक २' चे चित्रीकरण नागालँडमधील लोकेशनवर झाले नसले नसून दार्जिलिंग आणि कालिम्पोंग आणि लामहट्टा सारख्या आसपासच्या भागात पार पडलं आहे.

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील एक ऐतिहासिक हॉटेल, द एल्गिन दार्जिलिंगने पाताल लोक सीझन २ मध्ये सर्वाचं लक्ष वेधून घेतले आहे. पाताल लोकमध्ये दिसणारे रुली हे हॉटेल एल्गिन दार्जिलिंग आहे. एल्गिन दार्जिलिंग हे हॉटेल एका शतकाहून अधिक काळापासून तिथं आहे.

१८८७ मध्ये, कूचबिहारचे महाराजा नृपेंद्र नारायण यांनी हे निवासस्थान म्हणून बांधले होते. त्यांनी अनेक उन्हाळे दार्जिलिंगमध्ये घालवले. इथं एप्रिल-मे-जून दरम्यान तापमान ३० अंश सेल्सिअसच्या श्रेणीत असायचे. १९११ मध्ये नृपेंद्र नारायण यांच्या मृत्यूनंतर, ही मालमत्ता त्यांचा मुलगा आणि उत्तराधिकारी राजेंद्र नारायण यांच्याकडे गेली. त्यानंतर, ती पेव्हियन्स आणि ओकली या ब्रिटिश कुटुंबांना भाड्याने देण्यात आली.

१९६५ मध्ये, कुलदीपचंद ओबेरॉय यांनी नॅन्सी ओकलीकडून ही जागा विकत घेतली. तीन वर्षांनंतर, जेव्हा ओकली भारत सोडून इंग्लंडला गेले, तेव्हा कुलदीपचंद ओबेरॉय यांनी त्याचे नाव "न्यू एल्गिन हॉटेल" असं ठेवलं. त्यानंतर कुलदीपचंद यांनी मुलगा ब्रिजराज यांच्यासह एल्गिनचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले. मात्र त्यांनी कूचबिहारच्या महाराजांचे वैभव टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले.

१९७६ मध्ये सिक्कीमचे युवराज वांगचुक तेनझिंग नामग्याल हे तिथे आले तेव्हा ब्रिजराज यांनी त्यांना हॉटेलच्या आधुनिकीकरणाची कल्पना सांगितली. मात्र नामग्याल यांनी असे कधीही करू नका असं सांगितले आणि हॉटेलचे नूतनीकरण थांबले.

'पाताल लोक २' मध्ये दार्जिलिंग आणि कालिम्पोंगचा वापर करून ईशान्येकडील प्रदेश पडद्यावर जिवंत करण्यात आला. त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. जरी प्रत्यक्ष चित्रीकरण नागालँडमध्ये झाले नसले तरी, सीरिजमधल्या शक्तिशाली दृश्यांसह आणि सेट्सने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.