बिग बी, अजय देवगण ते सोनम... सैफ अली खानचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:51 IST2025-01-16T17:40:34+5:302025-01-16T17:51:10+5:30
यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींच्या घरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मुंबईतील (Mumbai) राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आलाय.
चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची माहिती सैफ अली खानच्या टीमकडून देण्यात आली आहे. जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री ३.३० वाजता सैफला लिलावती रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या मोठ्या स्टारच्या घरी चोरी होण्याची ही पहिली घटना नाही. यापुर्वीही काही सेलिब्रिटींच्या घरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.
यात पहिल्या क्रमांकावर आहेत ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो (Poonam Dhillon). अलिकडेच बॉलिवूडमधील पूनम ढिल्लो यांच्या घरी चोरी (Poonam Dhillon Mumbai House Robbery)झाली होती. पूनम ढिल्लो यांचा खार येथील घरातून १ लाख रुपयाचा डायमंड नेकलेस, ३५ हजार रुपयांची रोख आणि काही अमेरिकी डॉलरही चोरीला गेले. पोलिसांनी चोराला अटक केली होती. मिडिया रिपोर्टनुसार, पूनम यांच्या घरी पेंटिंगचं काम सुरु होतं. २८ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत हे काम चालू होतं. याचाच चोराने फायदा उचलला आणि घरातील कपाट खुले पाहून त्याने सामान चोरी केलं.
रिपोर्टनुसार, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी एकदा नाही तर दोनदा दरोडा पडलेला आहे.
२०१३ मध्ये आमिताभ यांच्या जुहू येथील जलसा बंगल्यातून सुमारे २५ हजार रुपये रोख आणि काही दागिने चोरीला गेले होते. तर त्यापुर्वी आठ हजार रुपयांची चोरी झाली होती.
अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरात चोरी झाली. तिच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानावर दरोडा पडला होता. अभिनेत्रीच्या घरात १ कोटी ४१ लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली होती. सोनमची आजी सासू सरला आहुजा यांनी तुघलक रोड पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली, तेव्हा ही बातमी समोर आली होती.
'सिंघम' म्हणून ओळख मिळवलेला अजय देवगण आणि काजोल (Ajay Devgan - Kajol) यांच्या घरात २०१३ मध्ये चोरी होती. चोरांनी त्याच्या घरातून १७ सोन्याच्या बांगड्या नेल्या होत्या. पण, या प्रकरणात त्यांच्या नोकरांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून ४ बांगड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानची बहीण अर्पिताच्या (Salman Khan Sister Arpita Khan)घरी चोरी झाली होती. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अर्पिता खानच्या नोकराला अटक केली होती. अर्पिता खान हिच्या खार येथील राहत्या घरातून हिऱ्याची कानातले चोरीला गेले होते.