पहिल्याच सिनेमाच्या शूटिंगवेळी श्रद्धा कपूरसोबत काय घडलं? घरी येऊन आईला म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:35 PM2024-10-15T15:35:48+5:302024-10-15T16:05:49+5:30

श्रद्धा कपूर खलनायक शक्ती कपूर यांची लेक असूनही तिला करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) नुकतंच 'स्त्री २' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. सिनेमाने ८०० कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला. सध्या श्रद्धा 'स्त्री २' चं यश साजरं करत आहे.

श्रद्धा कपूर ही हिंदी सिनेमातील खलनायक शक्ती कपूर यांची लेक असली तरी तिला बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करावं लागत आहे. श्रद्धा अनेकदा ग्रुपिजमची बळी पडली आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या सिनेमाचा अनुभव सांगितला जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

श्रद्धाला २०१३ साली आलेल्या 'आशिकी २' मधून लोकप्रियता मिळाली. पण त्याआधी तिने 'तीन पत्ती','लव्ह का दी एंड' या सिनेमातही काम केलं होतं. यात तिची जादू फारशी चालली नव्हती.

नुकतंच 'कॉस्मोपॉलिटन'ला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा कपूर म्हणाली, "पहिल्या सिनेमाच्या शूटिंगवेळी मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. शूटिंगच्या तिसऱ्याच दिवशी मी खूप वैतागले होते."

"घरी येऊन मी आईला सांगितलं की मला सेटवर जायचं नाही. कारण मला या फिल्मी दुनियेशी जुळवून घेता येत नाहीए. तेव्हा मी फक्त २० वर्षांची होते."

ती पुढे म्हणाली, "मी पहिल्यांदाच सेटवर असिस्टंट डायरेक्टरचं काम करत होते. मला आजही ते दिवस लक्षात आहेत. लोक नेहमीच तुमच्यासोबत चांगले असतील असं नाही."

"जर तुम्ही कोणी फार मोठं व्यक्तिमत्व आहात तर ते वेगळ्या पद्धतीने वागतात. पण जर तुम्ही कोणी खास नाही आहात तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची वागणूक असते."

श्रद्धाने यानंतर 'आशिकी २', 'द व्हिलन', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'छिछोरे', 'स्त्री', 'एबीसीडी' असे अनेक हिट सिनेमे केले. मात्र तिचा इंडस्ट्रीतील सुरुवातीचा अनुभव कायम लक्षात राहणारा होता.