Sid Kiara Wedding : यांचं ठरलंय ! नवीन वर्षात सिद्धार्थ किआराची लगीनघाई; कधी, कुठे वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 09:35 AM 2022-12-31T09:35:03+5:30 2022-12-31T09:41:36+5:30
नवीन वर्षाची सुरुवात बॉलिवुडमध्येही धुमधडाक्यात होणार आहे. मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत. कधी आणि कुठे होणार हा विवाहसोहळा बघुया.. सिद्धार्थ आणि किआरा बॉलिवुडमधलं सध्याचं फेवरेट कपल आहे. यांच्या लग्नाची चर्चा सतत सुरु असते पण दोघांनी आजपर्यंत कॅमेऱ्यासमोर नात्यावरही शिक्कामोर्तब केलेला नाही. पण चाहत्यांपासून काही लपून राहतं का. दोघांचे सुट्टी एंजॉय करतानाचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर हेच चर्चेतलं कपल आता बोहल्यावर चढणार असल्याचं कळतंय
सिड किआरा नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहेत. ६ फेब्रुवारी ही तारीखही निश्चित झाली आहे. सध्या दोघेही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. ४ आणि ५ तारखेला हळद, मेहंदी, संगीत याचं आयोजन करण्यात आलं आहे.
बॉलिवुड मंडळींचं सध्याचं लग्नासाठी फेवरेट डेस्टिनेशन राजस्थान हेच दिसतंय. सिड किआराचा विवाहसोहळाही जैसलमेर पॅलेस हॉटेल मध्ये होणार आहे. या विवाहसोहळ्याचे फोटो बाहेर येऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच लग्नात सुरक्षा व्यवस्थाही चोख असणार आहे.
याआधी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह सोहळाही राजस्थानमध्ये एका शाही महालात पार पडला होता. त्यानंतर लगोलग कॅटरिना आणि विकीनेही राजस्थानच्या पॅलेसमध्ये लग्न केले. आता सिद्धार्थ आणि किआरानेही लग्नासाठी राजस्थानलाच पसंती दिली आहे. जैसलमेर ज्याला गोल्डन सिटी म्हणले जाते अशा ठिकाणी सिड किआरा विवाहबद्ध होणार आहेत.
गेल्या काही वर्षात ज्या ज्या सेलिब्रिटींनी लग्न केले त्यात त्यांनी अगदी कमी पाहुण्यांना आमंत्रण दिले होते.यावरुन दिग्दर्शक करण जोहरने आपल्या कॉफी विथ करण शो मध्ये जाहीर नाराजी दर्शवली होती. मात्र सिद्धार्थने शो मध्ये करणला सांगितले होते की माझ्या लग्नात मी तुला नक्की आमंत्रण देईन. त्यामुळे आता सिड किआराच्या लग्नात कोणकोणते बॉलिवुड सेलिब्रिटी येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सिद्धार्थ आणि किआराच्या प्रेमाची सुरुवात शेरशाह चित्रपटापासून झाली. शेरशाह मध्ये सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट चांगलाच गाजला मात्र त्याहीपेक्षा चर्चा झाली ती या क्युट जोडीची. शेरशाहच्या प्रमोशन दरम्यान सिड किआराचे व्हायरल रील्स पाहून चाहते घायाळ झाले होते.
अद्याप दोघांकडूनही लग्नाबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र टाईम्स वृत्तपत्राच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्राचा मिशन मजनू हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर किआराचा गोविंदा नाम मेरा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. आता दोघेही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रवाना झाले आहेत.