रोल्स रॉयल्स खरेदी करणारी पहिली भारतीय अभिनेत्री, आयुष्यभर राणीसारखं जगली, २ संसार मोडले अन् अखेरच्या दिवसात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 05:24 PM2024-01-26T17:24:24+5:302024-01-26T17:28:27+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा जन्म इराकचा असून ती उदरनिर्वाहासाठी कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाली.

पन्नासच्या दशकातील अभिनेत्री नादिराचा जन्म इराकचा असला तरी तिचे कुटुंब पोटापाण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. सहज म्हणून चित्रपटात काम कारायचे म्हणून नादिराने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ‘मौज’ (१९४३) या हिंदी चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना नादिराने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. अर्थातच तिच्या या निर्णयाला घरातून विरोध झाला.

उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्यामुळे नादिराने हट्टाने या क्षेत्रात जाण्यासाठी परवानगी मिळवली. मेहबुब खान यांच्या आन चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत तिला प्रमुख भूमिका साकाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने राजकुमारीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात तिने एक बोल्ड सीन देखील दिला होता ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. या चित्रपटासाठी नादिराला ३६०० रुपये एवढे मानधन देण्यात आले होते. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी असल्यामुळे ती कुठे लपवून ठेवू असा प्रश्न तिच्या आईला पडला होता.

या चित्रपटानंतर नादिरा राजेशाही थाटात आयुष्य जगायला लागली होती. हेच कारण होते की त्यावेळी नादिराने रोल्स रॉयल्स ही त्यावेळची सर्वात महागडी कार खरेदी केली होती. रोल्स रॉयल्स वापरणारी नादिरा ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.

आन या चित्रपटानंतर नादिराचे आयुष्य फळफळले होते. अनेक चित्रपटासाठी तिला विचारणा होऊ लागली होती. मात्र ‘श्री ४२०’ हा चित्रपटात नादिराने पहिल्यांदा खलनायिका साकारली आणि तिच्या नायिकेच्या कारकिर्दीला अधोगती लागली. या चित्रपटानंतर नादिराला नकारात्मक भूमिकाच मिळू लागल्या. शेवटी निराश होऊन तिने त्या भूमिका स्वीकारल्या.

यादरम्यान नादिराने पहिले लग्न केले. मात्र आठवड्याभरात तिचा नवरा घरी मुली आणू लागला. नादिरा घरी असतानाही तो मुलींना आणत होता. हे पाहून नादिराने नवऱ्याचे घर कायमचे सोडून दिले. पुढे तिने दुसरा विवाह केला. मात्र काहीच दिवसात तिचा हा दुसरा संसार मोडकळीस आला. नादिराचा दुसरा नवरा खूप आळशी होता. आपणच जर याचा खर्च उचलायचा असेल तर लग्न कशासाठी केले म्हणून नादिराने दुसऱ्या नवऱ्यालाही सोडून दिले.

२००० सालच्या जोश चित्रपटात लेडी डिकोस्टाची भूमिका सकरल्यानंतर नादिरा अभिनय क्षेत्रातून गायब झाली. मुंबईत ती एकटीच राहू लागली, कारण तिचे भाऊ आणि नातेवाईक इस्रायलला गेले होते.

तिच्या मृत्यूपूर्वी तीन वर्ष ती तिच्या घरकाम करणाऱ्या मोलकरणीसोबत राहात होती. २४ जानेवारी २००६ रोजी नादिराला हृदयविकाराचा झटका आला त्याच अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अर्धांगवायू आणि यकृताच्या त्रासामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. ९ फेब्रुवारी २००६ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने तिचे निधन झाले.