Tujhe Meri Kasam : रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम', ना ओटीटीवर, ना टीव्हीवर; काय आहे यामागे कारण ? By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 09:57 AM 2023-01-04T09:57:03+5:30 2023-01-04T10:01:41+5:30
रितेश देशमुख आणि जिनिलिया म्हणजे महाराष्ट्राचे सर्वात लाडके कपल. त्यांची एक झलक सुद्धा लोकांना वेड लावते. आता तर त्यांनी वेड नावाचा चित्रपटच आणलाय जो तुफान गाजतोय. पण रितेश जिनिलिया या जोडीच्या नात्याची सुरुवात ज्या सिनेमामुळे झाली तो 'तुझे मेरी कसम' अनेकांनी पाहिला असेल. ३ जानेवारी २००३ रोजी 'तुझे मेरी कसम' हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया ही गोड जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. दोघांची एकमेकांशी ओळखही याच सिनेमामुळे झाली.
तुझे मेरी कसम २० वर्ष पूर्ण झाले. अनेकांनी हा सिनेमा बघितला असेलच पण असेही काही जण आहेत ज्यांनी अद्याप हा सिनेमा बघितलेला नाही. कारण हा चित्रपट ना टीव्हीवर लागतो ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर
सिनेमाची कथा कॉलेज जीवनावर आहे. रितेश जिनिलिया दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात पण त्यांच्यात प्रेमही आहे याची जाणीव त्यांना झालेली नसते. याचभोवती ही कथा फिरते.
मराठमोळ्या रितेशचा हा मुख्य भूमिकेतील हा पहिलाच बॉलिवुड सिनेमा असेल असं वाटणारही नाही इतक्या आत्मविश्वासाने त्याने काम केले आहे. तर जिनिलिया नेहमीसारखीच क्युट दिसली आहे.
तुझे मेरी कसम ने महाराष्ट्राला ही गोड जोडी दिली. या चित्रपटामुळे दोघांचे आयुष्यच बदलून गेले. ही जोडी हिट झाली आणि चाहत्यांच्या मनात घर करुन गेली.
के विजय भास्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर रामोजी राव यांनी सिनेमाची निर्मिती केली. आता गंमत अशी आहे की रामोजी राव यांनी सिनेमाविषयी एक मोठी निर्णय घेतला आणि त्यामुळेचट आज तुझे मेरी कसम कोणत्याच प्लॅटफॉर्मवर पाहता येत नाही
रामोजी राव यांनी सांगितले हा सिनेमा जर प्रेक्षकांना खूप आवडला तर तो त्यांनी हवा तेव्हा थिएटरमध्ये येऊनच बघायला हवा. असं म्हणत रामोजी यांनी सिनेमाचे सगळे राईट्स स्वत:कडेच ठेवले.
या कारणामुळेच ना या चित्रपटाची कधी डीव्हीडी आली आणि ना हा सिनेमा टीव्हीवर लागला. अगदी पायरेटेड कॉपी सुद्धा कोणाला मिळू शकली नाही. ओटीटी वर सिनेमा पाहायचा तर प्रश्न दूरच राहिला.
नंतर काही वर्षांनी रितेश आणि जिनिलियाने तेरे नाल लव्ह हो गया ही सिनेमा केला. याला सुद्धा प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता दोघेही वेड हा सिनेमा घेऊन आले आहेत जो बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय.