Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:59 IST2024-12-20T14:12:56+5:302024-12-20T14:59:15+5:30
२०२४ वर्ष आता काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. वाद-विवाद, धमक्या, अपहरण अशा गोष्टींमुळे सिनेसृष्टी चर्चेत आली.

सोशल मिडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री पूनम पांडेनेही (Poonam Pandey) या वर्षी खूप लाईमलाईट घेतलं. २ फेब्रुवारी रोजी तिने स्वत:च्याच मृत्यूची अफवा उडवली. सर्व्हायकल कॅन्सरमुळे पूनम पांडेचं निधन झालं अशी अफवा तिने आपल्या पीआर मार्फत पसरवली. नंतर लाईव्ह येत तिने आपण हे जनजागृतीसाठी केल्याचं सांगितलं.
तारक मेहता का उल्टा चष्मा लोकप्रिय मालिकेतील रोशन सिंह सोढी ची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह एप्रिल महिन्यात अचानक गायब झाला होता. कुटुंबियांनी त्याचं अपहरण झाल्याची तक्रारही केली होती.सगळेच चिंतेत होते. २५ दिवसांनी तो स्वत:च परतला. डोक्यावरील कर्ज, वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यातील समस्या यामुळे त्याने अध्यात्माच्या मार्गावर जायचं ठरवलं होतं असं कारण त्याने परत आल्यावर दिलं.
कंगना रणौत (Kangana Ranaut) या वर्षी भाजपची मंडी येथील खासदार बनली. पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर ती ६ जून रोजी दिल्लीला रवाना होत होती. तेव्हा चंदीगढ विमानतळावर तिला सीआयएसएफ महिला अधिकाऱ्याने थेट कानाखालीच वाजवली. शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांपैकी ती महिला होती म्हणून तिने कंगनावर राग काढला होता.
या वर्षात सलमान खानला (Salman Khan) पुन्हा लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळाल्या. इतकंच नाही तर त्याच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबारही झाला. त्याची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली. सलमानचे वडील सलीम खान यांनाही मॉर्निंग वॉक करताना घाबरवलं गेलं. सलमान खआन-लॉरेन्स बिश्नोई प्रकरण यावर्षीही चर्चेत राहिलं.
यावर्षी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा २ ने धुमाकूळ घातला. मात्र याला ४ डिसेंबर रोजी गालबोट लागलं. त्या दिवशी सिनेमाच्या स्क्रीनिंगला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा व्हेंटिलेटरवर आहे. याप्रकरणी १३ डिसेंबरला अल्लू अर्जुनलाही अटक झाली. त्याला एक रात्र जेलमध्ये राहावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी त्याची जामिनावर सुटका झाली.