स्थळ बुऱ्हाणपूर: छावा सिनेमानंतर किल्ला परिसरात ग्रामस्थ पुन्हा सोने शोधायला जुंपले; अनेकांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 10:46 IST2025-03-08T10:19:13+5:302025-03-08T10:46:25+5:30

Chhaava Movie Scene Burhanpur Effect: छावा सिनेमाच्या सुरुवातीला याच हल्ल्याचा सीन होता. छावा चित्रपटामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा या किल्ला परिसरात मुघलांनी सोने लपविले असल्याची चर्चा सुरु झाली.

छावा सिनेमानंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बुऱ्हाणपूरला खूप महत्व आले आहे. तेथील लोकांना बुऱ्हाणपूरच्या किल्ला परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आहे, यामुळे अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजुबाजुच्या परिसरात बॅटरी, मेटल डिटेक्टर घेऊन खोदाई सुरु केली. पोलिसांना समजेपर्यंत सकाळ झाली होती. या काळात काही लोकांना सोने मिळाल्याचे दावे केले जात आहेत.

मध्य प्रदेशमध्ये असलेल्या बुऱ्हाणपूरला मोठा इतिहास आहे. दख्खनचा दरवाजा म्हणून या भागाला ओळखले जात होते. असीरगढ किल्ला या भागात मुघलांच्या ताब्यात होता. छावा चित्रपटात याच किल्ल्यावर संभाजी महाराजांनी हल्ला केला होता व औरंगजेबाला दख्खनमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. या किल्ला परिसरात मोबाईल टॉर्च, छोट्या बॅटरींच्या उजेडात काही हजार लोक जमीन खोदतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांना याची खबर मिळाली परंतू, त्यांना घटनास्थळी जाण्यास दुपार झाली होती. तिथे त्यांना जागोजागी खड्डेच खड्डे दिसत होते. परंतू, त्यांना सोन्याची नाणी आणि ते शोधणारे लोक काही मिळालेले नाहीत. गुरुवारचा प्रकार आहे.

बुऱ्हाणपूर हे दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात होते, त्यामुळे ते मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. संभाजी महाराजांनी 30 जानेवारी 1681 रोजी हा हल्ला केला होता. 4,000 घोडदळाच्या सैन्यासह जुन्या खंदकातून हा हल्ला केला होता. त्यांनी श्रीमंत व्यापाऱ्यांची घरे लुटली होती. या हल्ल्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाने आपली मोहीम दख्खनच्या दिशेने वळविली होती.

छावा सिनेमाच्या सुरुवातीला याच हल्ल्याचा सीन होता. छावा चित्रपटामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा या किल्ला परिसरात मुघलांनी सोने लपविले असल्याची चर्चा सुरु झाली. आणि बुधवारी सायंकाळी ७ वाजता तिथे एकेक व्यक्ती कुदळ, खुरपे, चाळण घेऊन पोहोचू लागला. काहींनी सोबत मेटल डिटेक्टरही आणले होते. रात्रीच्या अंधारात या भागात काजवे चमकतात तसे रुप आले होते.

इंदूर ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. येथे तीन महिन्यांपूर्वी शेतात सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली होती. 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात मुघलांचा खजिना येथे ठेवण्यात आल्याचे सांगितले गेले. तेव्हापासून खजिन्यासाठी येथे खोदणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

इतिहासकार कमरुद्दीन फलक म्हणाले की, असीरगड किल्ल्याजवळ एक प्राचीन वस्ती होती. बहादूरशाह फारुकीच्या काळात १६०१ मध्ये अकबराने बुरहानपूर जिंकले होते. किल्ल्याजवळ नाणी मिळणे मोठी गोष्ट नाही.

यापूर्वीही येथे नाणी मिळाली आहेत. ग्रामस्थांना नाणी सापडत असतील तर प्रशासनाने नाणी शोधून काढावीत. ही नाणी किती जुनी आहेत हे तपासात समोर येईल.

पुरातत्त्व समितीचे सदस्य शालिकराम चौधरी म्हणाले की, बुरहानपूरमध्ये सोन्या-चांदीच्या नाण्यांसाठी टांकसाळ होती. असीरगढ येथे उत्खननादरम्यान प्रत्येक वेळी काही ना काही सापडते.