CM देवेंद्र फडणवीसांनी बघितला इमर्जन्सी चित्रपट, सांगितल्या कोणत्या गोष्टी खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:32 IST2025-01-16T19:18:50+5:302025-01-16T19:32:19+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१६ जानेवारी) आणीबाणीच्या कालंखडावर आधारित आणि अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असलेला इमर्जन्सी चित्रपट बघितला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून १९७५ ते १९७७ या काळात देशात आणीबाणी लावली होती. या कालखंडावर आधारित इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या विशेष शोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

मुख्यमंत्री फडणवीसांनी इमर्जन्सी चित्रपट कसा वाटला, याबद्दल भाष्य केले. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "इमर्जन्सी या सिनेमाच्या विशेष शो साठी मी आलो होतो."

"इमर्जन्सीच्या काळामध्ये या देशात जो काळा इतिहास घडला, तो अतिशय प्रभावीपणे या सिनेमात मांडण्यात आलेला आहे. स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांच्या जीवनातील चांगल्या घटनादेखील यात मांडण्यात आलेल्या आहेत", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री कंगना रणौतच्या अभिनयाचंही कौतुक केलं. ते म्हणाले की, "कंगनाजींनी, इंदिराजींची जी भूमिका आहे, ती अत्यंत प्रभावीपणे या सिनेमात साकारली आहे."

"खरं म्हणजे या देशाच्या इतिहासात इमर्जन्सी हा एक असा काळा अध्याय होता की, ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आलं", असे फडणवीस म्हणाले.

"सामान्य माणसांचे मौलिक अधिकार, हे संपवण्यात आले. त्याचं चित्रण यामध्ये पाहायला मिळतं. १९७१ साली ज्या दृढतेने भारताने बांगलादेश निर्माण केला, ती दृढता देखील यात पाहायला मिळते", अशा भावना फडणवीसांनी चित्रपट बघितल्यानंतर व्यक्त केल्या.

"एक ऐतिहासिक घटनांचा मागोवा आपल्यात यात पाहायला मिळतो. एका नेत्याचा प्रवास, हा देखील त्यात बघायला मिळतो. ज्या प्रभावीपणे इंदिराजींची भूमिका साकारली, त्याबद्दल मी कंगनाजींचे अभिनंदन करतो", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.