"तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे..." दीपिका पादुकोणचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 10:25 PM2022-08-06T22:25:17+5:302022-08-06T22:39:14+5:30

"असं वाटायचं की लोकांचा सामना न करण्याचा हाच एक मार्ग आहे"; वाचा दीपिकाचा अंगावर काटा आणणारा अनुभव

Deepika Padukone on Depression: एखादी अभिनेत्री मोठ्या पडद्यावर किंवा तिच्या सामाजिक जीवनात हसत-खेळत दिसली, तरी कधी कधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांतून जात असते हे कोणालाच कळत नाही. 'बॉलिवूडची मस्तानी' दीपिका पदुकोण या टप्प्यातून गेली होती. ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती, पण त्यावेळेस तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत असत, असा धक्कादायक खुलासा तिने नुकताच केला.

दीपिका कठीण टप्प्यातून पूर्णपणे बाहेर आली असून ती आता मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलताना दिसते. दीपिका मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी एक मोहीम चालवते. तिचे स्वतःचे 'लीव्ह लाफ लव्ह' फाउंडेशन आहे. या मार्फत मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असलेल्या लोकांना मदत करण्याच्या दिशेने कार्य केले जाते.

नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमात दीपिका सहभागी झाली होती. या कार्यक्रमात दीपिकाने मेंटल हेल्थ या विषयावर काही गोष्टी सांगितल्या. दीपिकाच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा तिची कारकीर्द अत्यंत चांगली होती, तिच्याकडे सारं काही होतं पण मानसिक समाधान आणि आराम मिळत नव्हता. त्यावेळी दीपिकाला डिप्रेशनचा सामना करावा लागला. इतकेच नव्हे तर तिला आत्महत्येचे विचारही येत होते असेही तिने सांगितले.

"२०१४ साली मला खूप एकटं वाटत होतं. मला खूप नंतर समजलं की नैराश्यामुळे माझी अशी अवस्था झाली आहे. खरं तर मी निराश-हताश होण्याचे काही कारण नव्हते, पण तरीही कळत नव्हतं की असं काय व्हायचं की मी एकदा बेडवर पडल्यावर मला उठावंसंच वाटत नव्हतं"

"मला फक्त झोपावंसं वाटत होतं. कारण मला वाटायचं की मी झोपून राहिले तरच जगाचा सामना करण्यापासून मी स्वत:ला वाचवू शकेन. तो काळ प्रचंड कसोटीचा होता, कारण त्या वेळी माझ्या मनात सतत आत्महत्या करण्याचे विचार येत होते", असा धक्कादायक खुलासा तिने केला.

"माझी ही परिस्थिती पाहून माझ्या आईला समजलं की माझं काहीतरी बिनसलंय. मला तिने सल्ला दिला की मी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. माझी अवस्था पाहून आईने मला थेट असंही विचारलं होतं की मला प्रेमात दगाफटका झालाय का, किंवा बॉयफ्रेंड संबंधी काही घडलंय का? किंवा कामात काही चूक झालीय का?"

"साधारणपणे आईने मला असे प्रश्न कधी विचारले नव्हते, पण तेव्हा तिने मला तसं विचारलं. मला एकदम उदास वाटायचं त्यानंतर अखेर मी आमच्या कुटुंबातील एका काऊन्सेलरला भेटले. त्यांनी मग मला मानसोपचार तज्ञ्जांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्यांचा सल्ला एकदम योग्य होता", असं दीपिकाने सांगितलं.

"पुढे अनेक महिने मी मानसोपचार तज्ञ्जांकडे गेले आणि त्यांकडून योग्य ती ट्रीटमेंट घेऊ लागले, औषधं गोळ्या घेतल्या. तेव्हा मला अखेर या कठीण अशा डिप्रेशनमधून बाहेर येता आलं. आपला समाज अद्यापही मानसोपचार तज्ञ्जांकडून उपचार घेणं हे फारसं स्वीकारत नाही", अशी खंत तिने व्यक्त केली.

"एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मी जेव्हा औषधोपचार आणि गोळ्या घ्यायचे तेव्हा मी डिप्रेशनवर उपचार घेतेय हे डोक्यात ठेवलं नाही, तरीही मला स्वत:हून मानसिक स्थैर्य जाणवू लागले. योग्य गोळ्यांमुळे मला पुन्हा सारं जग चांगलं आणि योग्य वाटायला लागलं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की मानसिक स्वास्थ्य म्हणजेच मेंटल हेल्थबद्दल उघडपणे बोललं गेलं पाहिजे. आणि गरज असेल तर मानसोपचार तज्ञ्जांची मदत नक्कीच घेतली पाहिजे", असा सल्ला दीपिकाने दिला.