३२ सिनेमे, ४८ TV सीरियलमध्ये काम करूनही अभिनय क्षेत्र सोडलं; UPSC देऊन अभिनेत्री बनली IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:32 IST2025-04-04T14:11:02+5:302025-04-04T14:32:37+5:30

चमकदार लाईफ, लग्झरी लाईफस्टाईल आणि ग्लॅमर सोडून वेगळ्या क्षेत्राकडे वळणं कुणासाठीही कठीण असते. परंतु प्रसिद्धी, पैसा सगळं काही मिळूनही काही जण त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. सिनेमा क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे वळतात.

भारतीय सिनेमा इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी त्यांचं चांगलं सुरू असलेले करिअर सोडून दुसरा मार्ग पत्करला. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिनं इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध करत लहानपणापासून मोठे होईपर्यंत बऱ्याच टीव्ही सीरियल आणि सिनेमात काम केले.

परंतु जेव्हा एन्टरटेन्मेंट करिअरमध्ये ती यशाच्या शिखरावर होती तेव्हाच अभिनय सोडून तिने संघर्षाचा मार्ग निवडला. तिने देशातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा दिली. केवळ परीक्षा देऊन ती थांबली नाही तर त्यात चांगले यश मिळवून एक आयएसएस अधिकारी म्हणून पुढे आली.

कर्नाटकच्या तुमकुर जिल्ह्यातील होसकेरे गावात जन्मलेली साऊथची अभिनेत्री एचएस किर्तनने वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. तिने कर्पूरदा गोम्बे, गंगा यमुना, मुदिना आलिया, उपेंद्र, कनूर, सर्कल इन्स्पेक्टर, लेडी कमिश्नर, हब्बा, पुटानी एजेंच यासारख्या अनेक सिनेमा आणि टीव्ही सीरियलमध्ये काम केले.

या अभिनेत्रीने ३२ सिनेमा आणि ४८ टीव्ही सीरियलमध्ये काम केले. तिच्या सिनेमाच्या यादीत अनेक सुपरहिट फिल्मचा समावेश आहे. परंतु जेव्हा तिचे करिअर अभिनय क्षेत्रात यश मिळवत होते, त्यावेळी या अभिनेत्रीने अभिनय सोडून यूपीएससी परीक्षा देत नवीन मार्ग निवडला होता.

एचएस किर्तनाने २०११ साली कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली आणि २ वर्ष राज्यात अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तिने यूपीएससी परीक्षा दिली परंतु सलग ५ वेळा परीक्षेत अपयश मिळवूनही हार मानली नाही. सहाव्या प्रयत्नात देशात १६७ वी रॅकिंग मिळवून तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

२०१३ साली एचएस किर्तना यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु त्यात फार यश मिळाले नाही. यात न थांबता पुढे आणखी मेहनत घेतली. ७ वर्षात त्यांनी ६ वेळा यूपीएससी परीक्षा दिली आहे. अखेर २०२० मध्ये UPSC पास करून त्यांनी त्यांचे स्वप्न साकार केले.

IAS अधिकारी बनल्यानंतर तिची पहिली पोस्टींग कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्तपदावर झाली. एचएस किर्तनाची यशोगाथा अशा तरूणींसाठी प्रेरणादायी आहे ज्या आयुष्यात कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची जिद्द ठेवतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनत घेतात.