सिद्धार्थच्या निधनानंतर प्रथमच व्यक्त झाले त्याचे कुटुंबीय; मुंबई पोलिसांचे मानले विशेष आभार By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:34 PM 2021-09-06T19:34:52+5:30 2021-09-06T19:57:39+5:30
Sidharth Shukla Death : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन आज ४ दिवस झालेत. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाने जगातून अखेरचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत. सिद्धार्थच्या कुटुंबियांना देखील हा मोठा धक्का बसला आहे. प्रथमच सिद्धार्थ शुक्लाचे कुटुंबीय सिद्धार्थच्या निधनानंतर व्यक्त झाले आहेत. विशेषतः त्यांनी मुंबई पोलिसांचे खास करून आभार मानले आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'सिद्धार्थच्या आयुष्याच्या प्रवासाचा एक भाग राहिलेल्या आणि त्याच्यावर निःस्वार्थी प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. हा प्रवास नक्कीच इथे संपत नाही कारण सिद्धार्थ शुक्ला आता आपल्या सगळ्यांच्या हृदयात कायमचा राहील!
सिद्धार्थ त्याच्या गोष्टी खाजगीत ठेवत असे. आमची अशी विनंती आहे की, या कठीण काळात आम्हाला एकटं सोडा. मुंबई पोलिसांच्या संवेदनशीलता आणि सहानुभूतीबद्दल त्यांचे विशेष आभार.
ते ढालीसारखे आमच्या संरक्षणासाठी उभे राहिले. त्यादिवशी ते आमच्यासाठी प्रत्येक क्षणी आमच्यासाठी उभे राहिले. सिद्धार्थला आपल्या आठवणी आणि प्रार्थनांमध्ये ठेवा. ओम शांती .... शुक्ला कुटुंब.'
आज सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी संध्याकाळी पाच वाजता प्रार्थना सभा आयोजित केली आहे. ज्यात त्यांचे चाहतेही झूम मीटिंग लिंकद्वारे सहभागी होऊ शकतात.
योगिनी दीदी आणि बहीण शिवानी ही प्रार्थना पूर्ण करतील. ब्रह्मा कुमारिस सदस्य आणि दिवंगत अभिनेत्याचे कुटुंबीय देखील उपस्थित राहतील. सिद्धार्थाचे अंतिम संस्कार देखील ब्रह्मकुमारी प्रथेनुसार करण्यात आले.
सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव होतं. ‘बिग बॉस13’ (Bigg Boss 13) झकळला आणि सिद्धार्थला अपार लोकप्रियता मिळाली. केवळ आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्यानं या शोच्या विजेतेपदावर नाव कोरलं. लोकप्रियता आणि यशाच्या शिखरावर असतानाच गत २ सप्टेंबर रोजी त्याच्यावर काळानं झडप घातली आणि त्याची प्राणज्योत मालवली. मुंबईत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झालेत.
सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. यानंतर तो उठलाच नाही. डॉक्टरांच्यानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तानंतर टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
मात्र, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या कुटुंबियांना प्रत्येकक्षणी पुरवलेल्या संरक्षणावर आभार व्यक्त केले आहे. तसेच सिद्धार्थच्या चाहत्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत.