Madhuri Dixit : “सुरूवातीला फारच कठीण गेलं...” लग्नानंतर माधुरीला करावा लागला अनेक समस्यांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 01:00 PM2023-02-26T13:00:55+5:302023-02-26T13:07:48+5:30

Madhuri Dixit : नेम-फेम सगळं काही मागे सोडून पतीसोबत अमेरिकेत गेलेल्या माधुरीचे लग्नानंतरचे काही दिवस फारच कठीण गेले. असं का?

आपल्या अदांनी सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना अचानक डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. इतकंच नाही तर लग्न करून अमेरिकेत राहायला गेली.

लग्नानंतर माधुरीलाही काही तडजोडी कराव्या लागल्यात. ताज्या मुलाखतीत माधुरी यावर बोलली. वैवाहिक आयुष्याविषयी ती व्यक्त झाली.

नेम फेम सगळं काही मागे सोडून पतीसोबत अमेरिकेत गेलेल्या माधुरीचे लग्नानंतरचे काही दिवस फारच कठीण गेले. असं का? तर यामागचं कारणही तिने सांगितलं.

पती डॉ. नेने यांच्या युट्युब चॅनलवर माधुरीने एक मुलाखत दिली. यात ती पतीबद्दल बोलली. पती डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या शेड्युलसोबत जुळवून घेणं, सुरूवातीला फारच कठीण गेल्याचं ती म्हणाली.

ती म्हणाली, “त्यांच्या शेड्युलसोबत मिळवून घेणं खूप कठीण होतं. दिवस असो किंवा रात्र सतत कॉल यायचे. त्यावेळी ते खूप कठीण होतं, कारण मुलांकडे फक्त मला बघावं लागायचं. त्यांना शाळेत घेऊन जाणं, घेऊन येणं आणि इतर कामंही मीच करायचे. ”

पुढे ती म्हणाली, “घरात कधी एखादी महत्त्वाची गोष्ट घडायची, पण त्यावेळी डॉ. नेने हॉस्पिटलमध्ये असायचे. मी आजारी असले तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये राहून इतर रुग्णांची काळजी घ्यावी लागायची”.

“अर्थात त्यांच्या पेशाबद्दल मला आदर होता. माझ्यासाठी अभिमानाची बाब होती, कारण ते कोणाचा तरी जीव वाचवत आहेत. मला माहीत होतं की ती व्यक्ती मनाने खूप चांगली आहे. लग्नात, तुमच्या पार्टनरला ओळखणं खूप गरजेचं असतं”, असं तिने स्पष्ट केलं.

ती पुढे म्हणाली, “ काही कठीण काळही होता, मात्र आम्हा दोघांना हे माहीत होतं की आम्ही जे काही करतोय ते चांगल्यासाठी करतोय आणि आम्हा दोघांनाही हे हवं आहे.”

माधुरीने 1999 मध्ये डॉ. नेनेंशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती अमेरिकेत राहायला गेली. या दोघांना आरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत.

माधुरीने 2003 मध्ये आरिनला आणि 2005 मध्ये रियानला जन्म दिला. जवळपास दहा वर्षांपूर्वी ती तिच्या कुटुंबीयांसोबत भारतात परतली.