Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवनं तृप्तीला चक्क रेल्वे स्टेशनवर केलं होतं प्रपोज; वाचा, सिद्धूची लयभारी लव्हस्टोरी... By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 02:59 PM 2022-06-24T14:59:38+5:30 2022-06-24T15:13:24+5:30
Siddharth Jadhav : सिद्धार्थ व तृप्तीचा प्रेमविवाह. दोघांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. सिद्धार्थची तृप्तीसोबत पहिल्यांदा ओळख एका ऑडिशनवेळी झाली होती... आपला सिध्दू अर्थात अभिनेता आणि कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्यानं सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. त्याच्या हटके स्टाईलवरही चाहते फिदा आहेत.
सध्या मात्र सिद्धार्थ जाधव एका वेगळ्याच कारणानं चर्चा रंगली आहे. सिद्धार्थ व त्याची पत्नी तृप्ती यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तृप्तीने सोशल मीडियावरून जाधव हे सासरचं आडनाव हटवलं आणि या चर्चेला उधाण आलं.
सिद्धार्थने मात्र या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. आम्ही एकत्र आहोत आणि आमच्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे, असं सांगत सिद्धार्थने त्याच्यात व तृप्तीत सगळं काही ऑल वेल असल्याचं म्हटलं आहे.
भूमिकेची लांबी छोटी असली तर आपल्या अभिनयाने ती मोठी करुन आपली छाप सोडण्यात सिद्धार्थ जाधवचा कोणीच हात धरु शकत नाही. अशा या अभिनेत्याला त्याच्या कारर्कीदीत त्याच्या पत्नीचीही म्हणजेच तृप्तीचीही मोलाची साथ लाभली आहे.
सिद्धार्थ व तृप्तींनी प्रेमविवाह केला होता. दोघांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. सिद्धार्थ जाधवची तृप्तीसोबत पहिल्यांदा ओळख एका ऑडिशनवेळी झाली.
होय, सिद्धार्थ ऑडिशनला गेलेला नव्हता आला तर तो ऑडिशन घेत होता. त्यावेळी सिद्धार्थ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. देवेंद्र पेम यांच्याकडे ‘रामभरोसे’या नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना या नाटकाच्या ऑडिशनसाठी तृप्ती अक्कलवार ही पण आली होती. तृप्तीही त्यावेळी नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करत होती.
ती या ऑडिशनसाठी आली, त्यावेळी ती जर्नलिझम करत होती. तिने ऑडिशन उत्कृष्ट दिली. सिद्धार्थला तर पहिल्याच भेटीत ती आवडली होती. ऑडिशन चांगली दिल्यामुळे त्याने तिला अभिनयासाठी विचारलं. पण तिने नकार दिला. कारण तिला पत्रकारितेत इंटरेस्ट होता.
सिद्धार्थला तिचा बिनधास्तपणा आवडला होता. त्याने तिला नाटकात काम करण्याची विनंती केली. परंतु, ती ठाम होती. का? कसे कुणास ठाऊक? पण, सिद्धार्थ तृप्तीवर अक्षरश: भाळला होता. तृप्ती आता भेटणार नाही माहित असल्यानं सिद्धार्थ कमालीचा अस्वस्थ झाला. मग काय त्याने तिला थेट प्रपोज करायचे ठरवलं.
सिद्धार्थ व तृप्ती दोघेही एल्फिन्स्टन स्टेशनवर उतरत असत. सिद्धार्थने नेमकी हीच संधी साधली. स्टेशनच्या तिकीट खिडकीजवळ, आजूबाजूला प्रचंड गर्दी असताना त्याने तृप्तीला थेट लग्नाची मागणी घातली.
तृप्तीला सिद्धार्थला ती आवडते हे माहित होतं. पण तो इतक्या लवकर प्रपोज करेल आणि थेट लग्नाची मागणी घालेल, असं तिना वाटलं नव्हतं. त्यामुळे तिने तिथेच त्याला नकार कळवला.
पण सिद्धू हार मानणाऱ्यापैकी नव्हता. लग्न नको, पण मैत्री तर चालेल ना? असं त्याने तिला विचारलं. मग दोघंही वारंवार भेटू लागले. फोनवर बोलणं सुरू झालं. दोघांत चांगली मैत्री जमली.
या काळात तृप्तीबाबत सिद्धार्थ खूप पझेसिव्ह झाला होता. तृप्तीबरोबर कोणी बोललं किंवा तिला कोणाचा फोन आला तरी त्याला राग यायचा. हे तृप्तीला जाणवत होतं. त्यामुळे तिने त्याच्याशी न बोलण्याचं ठरवलं.
पण नंतर नंतर सिद्धार्थच्या आठवणीनं ती सुद्धा व्याकुळ व्हायला लागली. आपण सिद्धार्थसारखा चांगला मित्र गमवायला नको, हे तिला जाणवलं. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि तब्बल 4 ते 5 वर्षांनी तिने सिद्धार्थला लग्नासाठी होकार दिला.