मराठी इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच आहे का? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, "हो आहे पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:14 IST2025-04-08T12:03:24+5:302025-04-08T12:14:37+5:30
दिग्दर्शकाला भेटून घरी आल्यावर त्याचा मेसेज येतो की... अभिनेत्रीने दिलं उदाहरण

'पछाडलेला' सिनेमात झळकलेली अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी (Ashwini Kulkarni) मराठी सिनेमे, नाटक, हिंदीतही काम करते. २०२२ साली आलेल्या 'नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा' सिनेमामुळे ती नुकतीच चर्चेत आली होती.
अश्विनी कुलकर्णीने नुकतंच मराठी इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं. मराठीत अभिनेत्रींना बोल्ड, हॉट अवतारात दाखवतच नाहीत. असं का? हा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
'पोस्टमन' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी म्हणाली, "मराठी इंडस्ट्रीला हॉट फिमेल दाखवताच आलेल्या नाहीत. अंकुश चौधरीने फक्त नो एन्ट्री मध्ये सई ताम्हणकरला दाखवलं. जे खूपच भारी होतं. पण नंतर कोणी केलं?
"नाय वरण भारत सिनेमात मीच सरप्राईज एलिमेंट होते. मराठीत उंच, हॉट, बोल्ड सुंदर बायका त्या ज्या पद्धतीने प्रेझेंट करायल्या हव्यात त्या कोणीच केलेलं नाही."
"माझं साऊथवर खूप प्रेम आहे. मणिरत्नम सरांनी ऐश्वर्या रायला ps1, २ मध्ये काय मस्त प्रेझेंट केलंय. हीच ऐश्वर्या धूम २ मध्येही होती. कसली बोल्ड होती. म्हणजे एक स्त्री वेगवेगळ्या प्रकारे कशी सुंदर दिसू शकते हे मराठी मेकर्सला कळलेलंच नाही. मराठी स्त्री सोशिकच असली पाहिजे किंवा बंड करुनच उठली पाहिजे अशीच अपेक्षा असते."
मराठी इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच आहे का? यावर अश्विनी म्हणाली, "आहे. जिथे चांगलं काहीतरी असतं तिथे वाईटही असतंच. मला वाटतं मराठीतल्या लोकांची हिंमत थोडी कमी असेल किंवा ते मला घाबरत असतील कारण मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे."
"मराठी इंडस्ट्रीत असं थेट कोणी विचारत नाहीत. उदाहरणार्थ, दिग्दर्शकाला भेटल्यानंतर मी घरी आल्यावर मला मेसेज येतो की, 'तू आज खूप छान दिसत होतीस.' हे तो समोर सांगत नाही. माझं असं झालं की अरे तू समोरही सांगू शकत होतास. हे अंडरकरंट असणं धोकादायक आहे."
"त्याच्या मेसेजला उत्तर दिलं तर आपलं काम पुढे जाणार आणि नाही दिलं तर आपण सुरक्षित राहणार पण काम हातातून जाणार या गोंधळात अनेक जणी असतात."
"माझं म्हणणं आहे की ज्याला काम द्यायचं असतं तो पहिल्या भेटीत सांगतो की आपण लूक टेस्ट करुया. छान दिसतेय असे मेसेज करत नाही. तो कामाचंच बोलतो. काम आवडलं तर तोंडावर कौतुक करतो. नाही आवडलं तर तेही सांगू शकतो. जेवण झालं का, घरी पोहोचली का, आज सुंदर दिसत होतीस असे मेसेज करत नाही."