१८ वर्षांच्या सुचित्रा यांनी आदेश बांदेकरांबरोबर पळून जाऊन केलेलं लग्न; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाले, "तिच्या वडिलांनी..." By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:27 PM 2023-10-02T18:27:22+5:30 2023-10-02T18:47:36+5:30
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही जोडी. त्यांच्याकडे एक आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जाणून घेऊया त्यांची फिल्मी लव्हस्टोरी. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही जोडी. त्यांच्याकडे एक आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. त्यांची लव्हस्टोरीही एकदम फिल्मी आहे.
आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांची भेट रथचक्र या मालिकेच्या सेटवर झाली होती. सुचित्रा यांना बघताच महाराष्ट्राचे लाडके भावोजी त्यांच्या प्रेमात पडले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली.
ते म्हणाले, "त्या मालिकेच्या सेटवर गेलो असतो, मला त्यात अभिनय करायचंय असं सांगण्यात आलं. माझा फार काही मोठा रोल नव्हता. तिथेच बाजूला पायऱ्यावर सुचित्रा बसली होती. त्या सीनदरम्यान चार-पाच टेक झाले. त्यादरम्यान सुचित्रा आणि माझी नजरानजर झाली. तिथूनच सुरुवात झाली.
"त्यानंतर तिच्याकडे बरंच काम होतं. हम पाँचसारखी मालिका ती करत होती. रथचक्रच्या शूटिंगवरुन आल्यानंतर मला असं वाटलं होतं ती हो म्हणेल. ती तेव्हा शाळेत होती. तिच्या शाळेच्या वेळेत मी बरोबर दादरला जायचो. पहिले काही दिवस मी तिला कारणं सांगून भेटत होतो"
"पण, नंतर काही दिवसांनी ती मला पाहून रस्ता बदलायला लागली. त्यावेळी आता काही होणार नाही, असं मला वाटलं होतं. पण, नंतर तिने माझ्यावर विश्वास ठेवून होकार दिला."
एकदा सुचित्रा आणि आदेश बांदेकर हॉटेलमध्ये बसलेले असताना अभिनेत्रीचे वडील तिथे आले. वडिलांना बघताच सुचित्रा यांनी आदेश बांदेकरांना इशारा केला. ते लगेच आतमध्ये निघून गेले आणि वेटरचा शर्ट घालून तिथून धूम ठोकली. या संपूर्ण प्रसंगानंतर सुचित्रा यांचे वडील चिडले होते.
आदेश बांदेकर यांच्याबरोबर लग्नाला सुचित्रा यांच्या वडिलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांना पळून जाऊन लग्न करावं लागलं होतं. याचाही किस्सा आदेश बांदेकरांनी सांगितला.
"हॉटेलमधील प्रसंगानंतर वडील खूप चिडले होते. पण, सुचित्राचं प्रेम आणि विश्वास होता. त्यानंतर १५ दिवसांनी सुमित्राला १८ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर एक महिन्याच्या नोटिसेनंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं," असं त्यांनी सांगितलं.
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी १४ नोव्हेंबर १९९० रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना सोहम हा मुलगा आहे. आईवडिलांप्रमाणेच सोहमदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकर यांच्या प्रवासात सुचित्रा अगदी खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभ्या होत्या. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अनेकदा ते दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करत असतात.