"मध्यरात्री उठून तो श्वास घेतोय का हे पाहते", श्रेयसच्या Heart Attack बद्दल बोलताना पत्नी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:56 PM2024-02-14T15:56:36+5:302024-02-14T16:02:46+5:30

श्रेयस आणि दीप्तीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं.

अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. कोणतंही व्यसन नसलेल्या आणि एकदम फिट असलेल्या श्रेयसला काही दिवसांपूर्वीच अचानक हृदयविकाराचा झटका आला.

हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने मृत्यूच्या दारातून परत आणलं. श्रेयसवर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. त्यानंतर आता तो कामावर परतला आहे.

श्रेयस आणि दीप्तीने नुकतीच 'मित्र म्हणे' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्या कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं.

दीप्ती भावुक होत म्हणाली, "मी अजूनही मध्यरात्री उठून बसते आणि श्रेयसकडे बघत राहते. तो श्वास घेतोय का? हे मी पाहत असते. त्याची छाती आणि पोट हलतंय का हे मी पाहते."

"जेव्हा मला खात्री होते की तो श्वास घेतोय तेव्हा मी परत झोपते. हॉस्पिटलमधून तो घरी आल्यानंतरही मी त्याच्याकडे नुसतंच बघत बसायचे."

"माझ्या डोक्यात कोणतेच विचार नसायचे. पण, मी फक्त बघत राहायचे. तो आहे, फक्त ही खात्री मला हवी असायची."

"तो बसलेला असतानाही मी त्याला हात लावून बघायचे. मी आताही असं करते."

श्रेयस आणि दीप्तीने २००४ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगीही आहे.