Zapatlela : तात्या विंचू झाला ३० वर्षाचा...! 'झपाटलेला'च्या सेटवरचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील...!! By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:48 PM 2023-04-16T15:48:34+5:30 2023-04-16T16:01:19+5:30
Zapatlela Movie Completed 30 Years: १९९३ साली आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं लीड कॅरेक्टर होतं तात्या विंचू... 'झपाटलेला' या मराठीतला आयकॉनिक सिनेमा. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की आवर्जून पाहिला जातो. आज या सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झालीत.
होय, १९९३ साली आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं लीड कॅरेक्टर होतं तात्या विंचू.
तात्या विंचू हा एक बोलका बाहुला. 'झपाटलेला' या सिनेमात मराठीत बोलक्या बाहुल्याचा प्रयोग पहिल्यांदाच झाला आणि तो तुफान यशस्वी झाला.
या सिनेमातील तात्या विंचू हा असुरी हास्य असणारा बाहुला आजही लोकांना आठवणीत आहे. सोशल मीडियावर आजही तात्या विंचूवरचे मीम्स व्हायरल होतात ते म्हणूनच.
तर चित्रपटासोबत हा तात्या विंचूही ३० वर्षांचा झाला आहे. त्या निमित्ताने सत्यजित पाध्ये यांनी एक खास पोस्ट शेअर करत झपाटलेलाच्या सेटवरचे काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.
रामदास पाध्ये यांनी तात्या विंचूला जिवंत केलं होतं. आता त्यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी आपल्या वडिलांचा हा बोलक्या बाहुल्यांचा वारसा पुढे नेत जगभरात पोहोचवला आहे.
'३० वर्ष. हो, झपाटलेला ह्या सिनेमाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. १६ एप्रिल १९९३ ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला आयकॉनिक बनवला', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'तात्या विंचू हे पात्र सुद्धा भारतीय व मराठी सिनेमाच्या इतिहासातलं एक अविभाज्य घटक बनलं. आज २०२३ साल आहे आणि आमच्या तात्या विंचूची लोकप्रियता दरवर्षी वाढतच आहे.', असं त्यांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
'सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक मीम बनत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं १९९३ ला जन्माला सुद्धा आली नव्हती, त्यांना सुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो. या निमित्ताने, आम्ही (झपाटलेला आणि झपाटलेला २ ची संपूर्ण टीम) आमच्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हे घडवून आणले', असं त्यांनी पुढे लिहिलं आहे.