सई ताम्हणकरच्या आईला वाटतोय लेकीचा अभिमान, घटस्फोटानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 03:03 PM2023-03-12T15:03:04+5:302023-03-12T15:16:09+5:30

सई ताम्हणकरला नुकतेच झी चित्र गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी तिची आईही उपस्थित होती.

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या अनेक कारणांनी चर्चेत असते. सध्या सईचं करिअर उभारी घेतंय. हिंदी सिनेमा 'मिमी' मधील भूमिकेसाठी तिला कौतुकाची थाप मिळत आहे.

मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला आहे. चाहत्यांना जितका सईचा अभिमान आहे त्याहून कित्येक पटींनी जास्त खूश तर तिची आई आहे.

सईने नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार स्वीकार करताना सईची आई मृणालिनी ताम्हणकर सुद्धा समोर उपस्थित होती. त्यांना झालेला आनंद पाहून सईलाही समाधान वाटले.

सईची मूळची सांगली जिल्ह्यातली. शाळेत असल्यापासूनच ती मैदानी खेळ खेळायची. सई राज्यस्तरावर कबड्डी खेळली आहे.तर याशिवाय तिने कराटेचंही प्रशिक्षण घेतलं आहे.

सई महाविद्यालयात असतानाच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. यानंतर सईची आई मृणालिनी ताम्हणकर यांनी एकटीने मुलीचा सांभाळ केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सईला अभिनयातही गोडी निर्माण झाली.

अभिनयात करिअर करायचं या आशेने सई मुंबईत आली तेव्हा तिच्या आईने तिला साथ दिली. काम मिळवण्यासाठी सईला खूप कष्ट घ्यावे लागले. या सगळ्यात तिची आई तिच्यासोबत होती.

महाविद्यालयात एकांकिका, नाटक केल्यानंतर सईने टीव्ही मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'या गोजिरवाण्या घरात', 'अग्निहोत्र', 'कस्तुरी' या मराठी मालिकांमध्ये सईने काम केलं.

त्यानंतर 'दुनियादारी', 'सनई चौघडे' या सिनेमांमधून तिला ओळख मिळाली. याशिवाय तिने आमीर खानचा सुपरहिट सिनेमा 'गजनी' मध्येही छोटी भूमिका साकारली होती.

सईला बॉलिवूड सिनेमा 'मिमी' मधील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मुलीने मिळवलेलं हे घवघवीत यश पाहून सईच्या आईला आज तिचा प्रचंड अभिमान वाटतो.