'ही कसली जोडी' म्हणत ट्रोल झालेली अभिनेत्री, लग्नानंतर दोन वर्षांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:43 PM2024-09-02T14:43:09+5:302024-09-02T14:52:48+5:30

लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर चंद्रशेखरनने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. त्याची पोस्ट चर्चेत आहे.

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी शंकर (Mahalakshmi Shankar) तिच्या जोडीदारामुळे चांगलीच चर्चेत आली होती. दोन वर्षांपूर्वी तिने निर्माता रविंदर चंद्रशेखरनसोबत (Ravindar Chandrasekaran) लग्न केलं. ही जोडी पाहून त्यांना खूप ट्रोल केलं गेलं होतं.

चंद्रशेखरन दिसायला डार्क, धिप्पाड असे तर महालक्ष्मी गोरी, नाजूक. त्यांच्या लूक्समध्ये काही ताळमेळच नसल्याने दोघंही सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर होते.

एवढं ट्रोलिंग होऊनही त्यांचा संसार टिकून राहिला. दोघांच्या लग्नाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रविंदरने महालक्ष्मीसोबत फोटो शेअर करत ट्रोलर्सला उत्तर देणारी खास पोस्ट लिहिली आहे. यावर महालक्ष्मीनेही भावना व्यक्त केल्या आहेत.

रविंदरने लिहिले, "लग्नाला यशस्वीरित्या २ वर्ष पूर्ण झाली. आम्ही अजूनही वेगळे झालेलो नाही. तुम्हाला सगळ्यांना आम्ही खोटं ठरवलं. आपण आयुष्यात आनंदी असलं पाहिजे असं मला वाटतं. आमच्यासोबत आमचं कुटुंब आहे."

"आम्हाला चिडवून किंवा वाईट बोलून काही उपयोग नाही. दोघं ३ महिने तरी एकत्र राहतील का? माझं सर्वांना हे प्रेमळ भाषेत उत्तर आहे. आमचा फोटो लाईक आणि शेअर करायला विसरु नका. महालक्ष्मी गेल्या वर्षभरात अनेक चढउतार आले. पण आपण एकमेकांना घट्ट धरुन होतो. लोकांना माझा फुकटचा एकच सल्ला आहे जर दोन लोक सोबत जन्माला आले आहेत तर त्यांना एकमेकांना समजून घेणं आणि सोबत मोठं होणं सोपं जातं. तुम्ही आपल्या माणसांसाठी छान जगता."

यावर महालक्ष्मी लिहिते, "दोन वर्षांपूर्वी आपण या सुंदर प्रवासाला सुरुवात केली. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक दिवस हा एक आशीर्वादाप्रमाणेच होता. तू सोबत असण्याने मला खऱ्या प्रेमाचं महत्व कळलं. नि:स्वार्थी पाठिंबा, अमर्यादित हसू आणि वेळेनुसार आणखी घट्ट होत जाणारं नातं."

"तू माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या आयुष्यातलं प्रेम आहेस. तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा खजिनाच आहे आणि या प्रेमासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजते. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अम्मू. भविष्यात आपल्यासमोर काय काय असणार आहे हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम शब्दात व्यक्त करता येणार नाही."