समीर चौघुलेंनी औक्षण केलं, दिग्दर्शकाने गाणं गायलं; हास्यजत्रा टीमने 'असा' साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:01 PM2023-08-11T14:01:19+5:302023-08-11T14:27:02+5:30

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमकडून प्राजक्ताच्या बर्थडेचं खास सेलिब्रेशन, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

मराठमोळी प्राजक्ता माळी अनेकांचा क्रश आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचं सूत्रसंचालन करत आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा वाढिदवस झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने लाडक्या प्राजूचा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला.

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजू अगदी आनंदात दिसत आहे. समीर चौघुलेंनी प्राजक्ताचं औक्षण केल्याचंही फोटोत दिसत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमकडून प्राजक्तासाठी खास केक ऑर्डर करण्यात आला होता. केक कापत प्राजक्ताने वाढदिवस साजरा केला. प्रसाद खांडेकर, निमिश कुलकर्णी, नम्रता संभेराव, रसिका वैंगुर्लेकर, चेतना भट, अरुण कदम यांसह हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटेही प्राजूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी उपस्थित होते.

लाडक्या प्राजूच्या बर्थडेनिमित्त एकत्र जमलेल्या हास्यजत्रेच्या कलाकारांनी गाण्यांची मैफीलही जमवली होती. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन मोटे गाणं गाताना दिसत आहेत.

“या बर्थडेला मला खूप हसायचं होतं. आणि हास्यजत्रेच्या टीममुळे हे शक्य झालं. त्यांच्यामुळे माझा दिवस चांगला गेला”, असं कॅप्शन प्राजक्ताने दिलं आहे. याबरोबरच तिने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.