"नवरा-बायको स्पर्धेत उतरले आहेत...", लग्नसंस्थेवर अभिनेत्रीचं स्पष्ट मत; ४७ व्या वर्षीही अविवाहित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:18 IST2025-01-23T13:12:38+5:302025-01-23T13:18:59+5:30
वयाच्या ४७ व्या वर्षीही शिल्पाने अद्याप लग्न का केलं नाही?

अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) हे नाव घरोघरी माहितच आहे. 'भाभीजी घर पर है' मालिकेतील 'अंगुरी भाभी' भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. नंतर बिग बॉस ११ ची ती विजेतीही बनली.
शिल्पा ४७ वर्षांची असून अविवाहित आहे. काही अभिनेत्यांसोबत तिचं अफेअर होतं मात्र तिने कधीच लग्न केलं नाही. लग्नाबाबतीत तिचे विचार नेमके काय आहेत हे नुकतंच तिने एका मुलाखतीत सांगितलं.
'टेली टॉक'ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदे म्हणाली, "अनेक लोक लग्नानंतर १० वर्षांनंतरही बोलतात की आमच्यात सुसंगता नाहीए. मला हे सगळं बकवास वाटतं. हे खरं तर दोन्ही बाजूंकडून असतं. कमी जास्त हे नात्यात होतच असतं."
"माझी फार सोशल लाईफ नाहीए. त्यामुळे मला कोणी आवडतच नाही. माझ्यासारखे लोक आम्ही एकटेच खूश असतो. जे भूतकाळात झालंय ना त्यानंतर असं वाटतं आता आपल्याला कोणीच नको. आपण एकटेच बरे. एकटं राहण्याची सवयही होते. जर उद्या कोणी आयुष्यात आलंच आणि जे चाललंय ते बिघडलं तर? त्यापेक्षा जे आहे ते बेस्ट आहे."
कुटुंबाचा लग्नासाठी दबाव येत नाही का? यावर ती म्हणाली, "नशिबाने माझ्यावर लग्नाचा कधीच दबाव नव्हता. माझ्या बाबांनाही माझ्यावर विश्वास आहे. ते म्हणतात जे तुला चांगलं वाटतं ते कर."
"मला वाटतं मुलांवर लग्न कर असा हट्ट धरणाऱ्या कुटुंबाला मी आजच्या काळात मागासलेलं म्हणेन. कारण आजकाल सगळं बदललंय. लग्नाचा नेमका अर्थ लग्न करणाऱ्या त्या दोघांनाही माहितच नसतो. नवरा बायको दोघंही स्पर्धेत उतरले आहेत."
"समाजाने आधीच स्त्रीचं काम काय आणि पुरुषांचं काय हे ठरवून दिलं आहे. मग यातच सगळी गडबड होते. मला एकटंच राहायचंय असं म्हणून मी स्वत:ला काही ब्लॉक ठेवलेलं नाही की."
"करायचं तर मी लग्नच करेन. लिव्ह इन रिलेशनशिप ही मला पटत नाही. जर मला चांगला मुलगा मिळाला तर करेन. पण लग्न हेच सर्वस्व नाही. मी प्रवाहानुसार चालेते. जे होईल जेव्हा व्हायचं तेव्हा होईल असा माझा दृष्टिकोन आहे."