Sheezan Khan : शिझान जेलमध्ये तर लेक रुग्णालयात! "आमचा गुन्हा काय?"; आईची इमोशनल पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:37 AM2023-01-23T10:37:31+5:302023-01-23T10:58:12+5:30

Tunisha Sharma And Sheezan Khan : शीझान खानच्या बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या आईने इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी तिच्या शोच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्रीने दुपारचे जेवण केले आणि नंतर को-स्टार शीझान खानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. तुनिशाच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आणि खळबळ उडाली.

तुनिशाच्या आईने अभिनेता शीझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. शीझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केला आहे. शीझानचे कुटुंबीय त्याची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप यश आलेले नाही.

शीझान खानच्या बहिणीला याच दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या आईने इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शीझानची आई कहकशां परवीन यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीवर शीझानची बहीण आणि अभिनेत्री फलक नाझचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे.

फोटोमध्ये फलक बेडवर झोपलेली दिसत आहे. तसेच फोटो शेअर करताना शीझानच्या आईने कॅप्शनमध्ये 'सबर' असं म्हटलं आहे. याशिवाय शीझानच्या आईने एक नोट शेअर केली असून आमचा गुन्हा काय आहे?, असा प्रश्नही विचारला आहे.

"मला समजत नाही की आमच्या कुटुंबाला कशाची शिक्षा दिली जात आहे आणि का? माझा मुलगा शीझान गेल्या 1 महिन्यापासून कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात कैद्यांप्रमाणे शिक्षा भोगत आहे. माझी मुलगी फलक रुग्णालयात दाखल आहे. शीझानचा लहान भाऊ, जो ऑटिस्टिक मूल आहे, आजारी आहे" असं म्हटलं आहे.

शीझानच्या आईने पुढे लिहिले की, "एका आईने दुसऱ्या मुलावर आई म्हणून प्रेम करणे हा गुन्हा आहे का? किंवा बेकायदेशीर? फलकने तुनिशावर लहान बहिणीप्रमाणे प्रेम करणे गुन्हा की बेकायदेशीर? की शीझान आणि तुनिशाने आपल्या नात्याला स्पेस देणं किंवा ब्रेकअप करणं हा गुन्हा आहे की बेकायदेशीर?"

"आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आम्हाला त्या मुलीवर प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का? आमचा गुन्हा काय आहे?" तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांनाचा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तुनिशा आणि शीझान खानचे कुटुंबीय एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.

अभिनेत्रीच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान, शीझानच्या कुटुंबीयांनी आता तुनिशासोबत केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कुटुंबीयांनी तुनिषा शर्मासोबतच्या Whatsapp संभाषणाचा एक स्क्रीनशॉट जारी केला आहे. चॅटमध्ये तुनिशा शीझानच्या आईशी बोलताना दिसत आहे.

तुनिशाच्या चॅटचा हा स्क्रीनशॉट 6 ऑक्टोबरचा आहे. त्यादिवशी रात्री 11.30 वाजता तुनिशाने शीझान खानच्या आईला मेसेज केला आणि विचारलं - झोपलात का? पण शीझानच्या आईने तिच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर 6 दिवसांनी 12 ऑक्टोबरला तुनिषाने पुन्हा शीझानच्या आईला मेसेज केला.

तुनिशाने तिच्या मेसेजमध्ये लिहिले- "जेव्हा माझ्यासोबत कोणीही उभं नसतं, तेव्हा मला माहीत आहे की तुम्ही आणि आपी (फलक नाज) नेहमीच उभे राहाल. तुम्हा दोघांवर माझं खूप प्रेम आहे, काळजी करू नका, सगळं ठीक होईल, मी इथे तुमच्यासोबत आहे…".

या मेसेजला उत्तर देताना शीझानच्या आईने लिहिलं होतं की - "बेटा तू सदैव आनंदी राहा, तुझी तब्येत ठीक राहो. या चॅटच्या माध्यमातून तुनिशाचे तिच्या आईसोबतचे संबंध चांगले नव्हते आणि त्यामुळे ती शीझानच्या आईच्या खूप जवळ होती, हे सांगण्याचा प्रयत्न शीझानच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आहे.

तुनिषा शर्माच्या मैत्रिणीने अभिनेत्रीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आज तक' या न्यूज पोर्टलशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. तुनिषा शर्माची मैत्रीण आणि माजी को स्टार असलेल्या सोनिया सिंहने खुलासा केला की तुनिशा काही आठवड्यांपासून नाराज होती, त्यामुळे तिच्याशी कमी बोलणं व्हायचं.

"तुनिशाकडे अनेकदा पैसे नसायचे. काही दिवसांपूर्वी तिने माझ्याकडे 3000 रुपये उधार मागितले होते, मग मी तिला विचारलं की काय झालं इतकेही पैसे नसायला. तुनिशाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिने फोन केला होता आणि आपण तिच्यासोबत असल्याचे तिच्या आईला खोटं सांगण्यास सांगितलं होतं" असंही सोनिया म्हणाली.