Trial By Fire, Rajshri Deshpande: -म्हणून मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेनं वाढवलं १६ किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 05:07 PM2023-01-19T17:07:45+5:302023-01-19T17:19:36+5:30

Trial By Fire, Rajshri Deshpande: ‘ट्रायल बाय फायर’ या सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सीरिजमध्ये मराठमाेळी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने साकारलेल्या भूमिकेचंही जबरदस्त कौतुक होतेय.

‘ट्रायल बाय फायर’ या सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सीरिजमध्ये मराठमाेळी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने साकारलेल्या भूमिकेचंही जबरदस्त कौतुक होतेय.

राजश्रीने या सीरिजसाठी प्रचंड मेहनत घेतली. अगदी आपल्या भूमिकेसाठी शारीरिक बदलही स्वीकारलेत. होय, या सीरिजचं शूटींग सुरू केलं तेव्हा तिचं वजन 50 किलो होतं. शूटींग संपलं तेव्हा हेच वजन 66 किलोंवर पोहाेचलं होतं.

‘ट्रायल बाय फायर’ ही सीरिज उपहार अग्निकांडावर आधारित आहे. 13 जून, 1997 रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात ‘बॉर्डर’ चित्रपटाचा शो सुरू असताना आग लागली होती.

या आगीमुळे थिएटरमध्ये अडकून सुमारे 59 लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता तर चेंगराचेंगरीमुळे 103 जण गंभीर जखमी झाले होते. देशाच्या इतिहासातील या अत्यंत अत्यंत भयावह आगीच्या घटनेवर ही वेब सीरिज बेतलेली आहे.

या सीरिजमध्ये अभिनेता अभय देओल हा शेखर कृष्णमूर्ती यांची भूमिका साकारतोय. उपहार थिएटरमधील आगीच्या घटनेत शेखर कृष्णमूर्ती यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं होतं.

सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे ही त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तिने नीलमची भूमिका साकारली आहे. नीलम व शेखर जवळपास 20 वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायासाठी लढतात.

अलीकडे एका मुलाखतीत राजश्री नीलमच्या भूमिकेबद्दल बोलली. ती म्हणाली, राजश्री राहून मी नीलम साकारू शकत नव्हते. मला नीलमला शोधायचं होतं, तिच्यासारखं दिसायला, विचार करायला हवं होतं.

पुढे ती म्हणाली, 20 वर्ष लढा देणाऱ्या नीलमची भूमिका माझ्या वाट्याला येणं यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते. मी या सीरिजचं शूटींग सुरू केलं तेव्हा माझं वजन 50 किलो होतं. शूटींग संपता संपता ते 66 किलो झालं होतं.

तिने सांगितलं, मला वजन वाढवावं लागलं. कारण मला नीलम हे कॅरेक्टर वेगवेगळ्याप्रकारे दाखवायचं होतं. तिचा २० वर्षांचा प्रवास मला उभा करायचा होता. वय वाढतं तसे शारिरीक बदल होतात, ते मला दाखवायचं होतं.

माझ्याकडे वजन वाढवायला फार कमी वेळ होता. त्यामुळे या काळात मी अनहेल्दी प्रकारानं वजन वाढवलं. खरं तर हे योग्य नव्हतं. पण काय करणार. काम मिळालं तर ते हातचं जायला नको. अचानक मला काढून टाकलं तर त्यामुळे स्वत:ला इतकं तयार करायचं की, दिग्दर्शकानेही हीच माझी नीलम असं म्हणायला हवं. मी अशाच पद्धतीने काम करते, असं ती म्हणाली.