कधीकाळी कामासाठी दारोदार भटकला होता यामी गौतमचा पती आदित्य धर, कुणी पाणीही विचारेना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 03:23 PM2021-06-07T15:23:28+5:302021-06-07T15:32:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. साहजिकच यामीच्या पतीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) गत शुक्रवारी दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याच्यासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. साहजिकच यामीच्या पतीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच. आदित्य धर हा बॉलिवूडचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमाने आदित्यला नवी ओळख दिली.

अर्थात यामागे अपार संघर्ष होता. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणा-या आदित्यसाठी हा संघर्ष सोपा नव्हता. एकेकाकी आदित्य कामासाठी दारोदार भटकला. आदित्य मूळचा दिल्लीचा.

12 मार्च 1983 साली जन्मलेल्या आदित्यचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले होते ते 2008 साली.

होय, 2008 साली ‘काबुल एक्सप्रेस’ या सिनेमासाठी त्याने गाणी लिहिलीत. म्हणजेच गीतकार म्हणून त्याने बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली होती.

यानंतर हाल ए दिल, वन टू थ्री, डॅडी कूल या सिनेमासाठी त्याने गीतकार म्हणून काम केले. 2010 साली अजय देवगणच्या ‘आक्रोश’साठी संवाद लिहून तो लेखक म्हणूनही नावारूपास आला.

2006 साली मुंबईत आला तेव्हा आदित्यने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सुरू केले होते. त्याआधी अनेक दिवस त्याने कामाच्या शोधात अनेकांच्या पाय-या झिजवल्या होत्या.

आदित्य रोज सकाळी उठायचा आणि अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये जात काम मागायचा. कसेबसे अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम मिळाले. पण अस्टिस्टंट डायरेक्टरला विचारतेय कोण?

त्यावेळी अस्टिस्टंट डायरेक्टरला कुणी पाणीही विचारायचे नाही. पैसेही फार नव्हते. पण आदित्यने हिंमत हरली नाही.

वेळ येईल तेव्हा माझे टॅलेंट लोकांना दिसेल, हे त्याने मनाशी पक्के ठरवले होते. अखेर तो क्षण आला. ‘उरी’च्या निमित्ताने आदित्यला स्वत:चे टॅलेंट सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

‘उरी’च्या सेटवरच आदित्य व यामी गौतम यांचे प्रेम बहरले. मात्र दोन वर्षे दोघांनीही याचा थांगपत्ता कुणाला लागू दिला नाही.