Year Ender 2021: अनेकांचा विश्वास बसेना पण वर्षाअखेरिस खऱ्या ठरल्या बॉलिवूडच्या या 9 ‘अफवा’ By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 08:00 AM 2021-12-25T08:00:00+5:30 2021-12-25T08:00:06+5:30
Year Ender 2021 : या मावळत्या वर्षांत अनेक घडामोडी घडल्या, तशाच अफवाही पसरल्या. पण वर्षाअखेरिस यापैकी काही अफवा सत्यात उतरताना दिसल्या. त्यावर एक नजर... यंदा सप्टेंबर महिन्यात विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरूवातीला कुणालाच विश्वास बसेना. अगदी कॅटही राजरोजपणे या सगळ्या अफवा असल्याचं शेवटपर्यंत सांगत होती. पण ही अफवाच शेवटी खरी ठरली. गेल्या 9 डिसेंबरला विकी व कॅट दोघंही शाही थाटात लग्नबंधनात अडकले.
सामंथा रूथ प्रथु व नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. ही अफवा ठरावी, अशीच दोघांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण दुर्दैवाने ही चर्चा खरी ठरली. 2 ऑक्टोबरला नागा व सामंथा दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली.
अभिनेत्री दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट लग्नाची बातमी आली आणि पाठोपाठ दिया प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती. प्रेग्नंट असल्यामुळेच दियाने घाईघाईत लग्न केल्याचं म्हटलं गेलं होतं. यानंतर खरंच एप्रिलमध्ये दियाने प्रेग्नसीची घोषणा केली होती.
आमिर खान व किरण रावच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप आधीपासूनच होत्या. पण आमिर व किरण यापैकी दोघंही काहीही बोलायला तयार नव्हते. लोकांना या अफवा वाटल्या. पण वर्ष संपता संपता या कपलने घटस्फोटाची घोषणा केली.
करिनाने याचवर्षी दुस-या मुलाला जन्म दिला होता. त्याच्या जन्माच्या सहा महिन्यानंतर रणधीर कपूर यांनी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी नातवाच्या नावाचा उल्लेख केला होता आणि काही तासांत ही पोस्ट डिलीट केली होती. इथून करिनाच्या मुलाच्या नावाबद्दल अफवा उडाली होती आणि ती खरी ठरली.
सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी व क्रिकेटपटू के. एल राहुल यांच्या अफेअरच्या चर्चा या वर्षाच्या सुरूवातीपासूनच होत्या. पण या अफवा आहेत की सत्य, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर दोघांनी या नात्याची कबुली दिली आणि अफवा खरी सिद्ध झाली.
दीपिका पादुकोण साऊथ डेब्यू करणार, अशी बातमी आली होती आणि जुलैमध्ये ही बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं. दीपिका प्रभाव व नाग अश्विन यांच्या चित्रपटातून साऊथ डेब्यू करणार असल्याचं स्पष्ट झालं.
अंकिता लोखंडे बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्न करणार, अशा चर्चा अनेक महिन्यांपासून होत्या. पण याच महिन्यात दोघांनी लग्नगाठ बांधली आणि ही चर्चा खरी ठरली.
फेब्रुवारी महिन्यात सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा कानावर आल्या होत्या. पण यानंतर अचानक दोघंही एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते आणि या अफवा असल्याचं मानलं गेलं होतं. पण डिसेंबरच्या शेवटी कालपरवा अखेर खुद्द सुश्मितानेच ब्रेकअप कन्फर्म केले.