पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
By देवेंद्र जाधव | Published: October 12, 2024 02:01 PM2024-10-12T14:01:21+5:302024-10-12T14:03:22+5:30
'फुलवंती' सिनेमाच्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (snehal tarde, phullwanti)
नवरात्र उत्सवानिमित्त लोकमत फिल्मीतर्फे 'नवदुर्गा' या संकल्पनेतील आजची दुर्गा आहे स्नेहल प्रवीण तरडे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहल तरडे 'फुलवंती' सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांचा दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता? काय आव्हानं आली? सिनेक्षेत्रात महिला दिग्दर्शिका कमी असण्याचं कारण काय? याविषयी स्नेहल तरडेंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
>>> देवेंद्र जाधव
1) फुलवंती रिलीज झालाय तर काय भावना मनात? किती भीती आणि दडपण आहे?
भीती नाहीय तशी. पण प्रतिसादाबद्दलची धाकधुक आहे. आपण काहीतरी कष्ट घेतलेत तर त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहण्याची धाकधुक आहे मनामध्ये.
2) अभिनयक्षेत्रात सक्रीय असून दिग्दर्शनात का यावंसं वाटलं?
खरं सांगायचं तर दिग्दर्शनात येण्यासाठी मी आधीपासून स्ट्रगल असा करत नव्हते. कॉलेजमध्ये असताना काही एकांकिकेचं दिग्दर्शन केलंय. लेखन मी आधीपासून केलं होतं. कॉलेजमध्ये असताना दिग्दर्शन करत होते. परंतु पुढे मी कधी दिग्दर्शनाचे प्रयत्न केले नाहीत. योगायोगाने हा प्रोजेक्ट दिग्दर्शनासाठी माझ्याकडे आला. प्राजक्ता प्रवीणकडे हा प्रोजेक्ट घेऊन गेली होती.
मूळात ही स्त्रीची कथा आहे. त्यामुळे तिचं भावविश्व पडद्यावर दाखवण्यासाठी स्त्री दिग्दर्शिका असावी असा प्राजक्ता आणि प्रवीणचा विचार झाला. त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला. स्नेहल हे खूप चांगलं करु शकेल असं प्रवीणला वाटलं. प्राजक्ताही या गोष्टीला तयार झाली. त्यामुळे योगायोगाने हा प्रोजेक्ट माझ्याकडे आलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की, हा प्रोजेक्ट मी खूप हलक्यात घेतला. मी अत्यंत मनापासून कष्ट घेतलेत. माझा इतक्या वर्षांचा अभ्यास, अनुभव हे सगळे मी दिग्दर्शनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
3) या सिनेमासाठी प्रवीण तरडेंनी कसं मार्गदर्शन केलं?
प्रवीणचा या प्रोजेक्टसाठी मॉरल सपोर्ट खूप होता. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. एक एक गोष्ट म्हणजे हे कसं करायचं, ते कसं करायचं हे, असं मार्गदर्शन नाही केलं त्यांनी. तो म्हणाला तू कर पण कुठे चुकलीस किंवा अडखळलीस तर मी आहे एवढं लक्षात ठेव. बाकी तुला प्रत्येक स्टेपवर मी सांगणार नाही. मी त्याच्यासोबत इतकी वर्ष राहतेय, त्याचं दिग्दर्शन मी अनुभवलंय तर संगतीमुळे हा गुण माझ्यातही उतरला असेल कदाचित. त्यामुळे माझ्याकडून तसं छान झालेलं आहे. असं छान झालंय म्हणणार नाही पण कष्ट केलेत.
4) महिला म्हणून घर आणि शूटींग सांभाळण्याची तारेवरची कसरत कशी होतेय?
मला घर सांभाळायला खूुुप आवडतं. त्यामुळे मला हे काम करताना घराकडे किती दुर्लक्ष होतं हे प्रवीणकडे बघून मला माहित होतं. जास्तीतजास्त वेळ प्रवीणला घराबाहेर राहायला लागतं, हे मला ठाऊक होतं. पण मला एक महिला म्हणून गिल्ट वाटायला लागलं एकक्षणी की आपण खूपच दुर्लक्ष करतोय. पुरुषांना तितका गिल्ट येत नसावा. कारण घरासाठीच मी करतोय हा त्यांचा दृष्टीकोन असल्याने इतका गिल्ट येत नसेल.
स्त्री म्हणून हा गिल्ट निश्चितच असतो. आपलं मुलाकडे लक्ष नाहीय, त्याच्या अभ्यासाचं काय चाललंय, तो काय खातोय, काय चाललंय हे माहित नाहीय. त्यामुळे त्याचं गिल्ट येतं. पण माझी आई खंबीरपणे माझ्यासोबत आहे. माझी आई खूप मोठी सपोर्ट सिस्टिम आहे. ती मुलाकडे बघत असल्याने एक निश्चिंतता माझ्या मनात होती.
5) महिला दिग्दर्शिका या क्षेत्रात फार कमी आहेत. यामागचं कारण काय वाटतं?
टॅलेंटची कमी आहे असा भाग नाही. खूप टॅलेंटेड महिला निश्चितच आहेत. पण स्त्री असल्याने सगळ्यांनाच घराची ओढ, मुलांची काळजी हे निसर्गतःच स्त्रीच्या मनात येतात. आणि हे खूप काळासाठी बाजूला ठेवावं लागतं. या क्षेत्रात ऑफिससारखं काम होत नाही. सकाळी ७ ला गेलं रात्री ९ वाजता घरी आलो, असं होत नाही. खूप वेळ घराच्या बाहेर राहावं लागतं. खूपदा घरामध्ये तशी सपोर्ट सिस्टिम नसते.
घरातील स्त्री बाहेर पडली म्हणल्यावर घर कोण सांभाळणार, यासाठी जी सपोर्ट सिस्टिम लागते ती नसते. मानसिकरित्याही तयार व्हायला खूप वेळ लागतो. आपल्याला घर सोडून काम करायचंय, झोकून द्यायचंय. यामध्ये समतोल साधण्यास स्त्रीला अडणची येत असतील. टॅलेंटची तर काहीच कमी नाही, हे निश्चित. फक्त दिग्दर्शनच का, तर महिलांना जे काम करण्याची इच्छा आहे, स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांना अधिकार आहे. स्वप्न पूर्ण करायची तजवीज करावी लागते महिलांना. याला पर्याय नाही. यावरती प्रत्येक महिलेने काम केलं पाहिजे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सभोवतालच्या गोष्टी आपल्याला कशा मॅनेज करतील, त्यामध्ये कसा बॅलन्स साधतील यावर काम केलं पाहिजे.
6) फुलवंतीचं दिग्दर्शन करताना काय अनुभव आला?
मी फक्त अभिनय करत असताना कोणीतरी मॉनिटरच्या मागे असतं. त्यामुळे वेळेची बचत होते. पण यावेळी मी स्वतः काम करणार त्यानंतर मॉनिटरमागे येऊन शॉट ओके आहे की नाही बघणार, यामध्ये थोडासा वेळ जातो. एक छोटा दिलासा असतो की आपल्याला रागावणारं कोणी नाहीय. काही चुकलं, काही फम्बल झालं तर. प्रवीण थोडा कडक शिस्तीचा असल्याने तो रागावतो. आता मी दिग्दर्शक असल्याने अभिनयाच्या बाबतीत मला रागावणारं कोणी नव्हतं.
7) सेटवर घडलेला एक आव्हानात्मक किस्सा?
शूटींगच्या पहिल्याच दिवशी खूप पाऊस आला. भोरच्या राजवाड्यात आम्ही शूटींग करत होतो तिकडे ड्रेनेजची सिस्टिम नाहीय. त्यामुळे पाणी सेटवर साचलं. एवढा कष्ट करुन निर्माण केलेला सेट भिजून गेला. खराब झाला. आम्हाला तिथे शूट करता नाही आलं. मी अध्यात्मिक वृत्तीची असल्याने एखाद्या शुभकार्याची सुरुवात करताना पहिल्या दिवशी पाऊस आला तर परमेश्वराचे आशीर्वाद समजायचे असतात. पण शेवटी आर्थिक नुकसान झालं आणि आमचं प्लॅनिंग गडबडलं.
त्यामुळे पुढच्या दिवशीचे सीन जे आम्ही शूट करणार होतो त्याची एवढी तयारी नव्हती. त्यामुळे पटकन ती तयारी करुन उद्याचे सीन आज वेगळ्या ठिकाणी शूट केले. त्याला थोडेसे कष्ट पडले. पहिलाच दिवस होता हा. काहीच अनुभव नसल्याने थोडीशी मी गडबडले.
8) दिग्दर्शक म्हणून तुमचा कोणी सेटवर ओरडा खाल्ला आहे का?
मी नाही कोणावर ओरडले. माझा असा स्वभाव पण नाहीय कोणाला ओरडण्याचा. अनुभवाने, मानाने, प्रतिष्ठेने मी सर्वांपेक्षा लहान होते सेटवर. माझ्यासोबतचे कलाकार, अभिनेते, तंत्रज्ञ हे सगळेच जण अनुभवाने खूप मोठे आहे. त्यामुळे मी कधीच नाही ओरडले. त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं असलं की, तू बिनधास्त ओरड आमच्यावर, तुला जे पाहिजे ते करवून घे , हा फ्रीडम त्यांनी दिला होता. हा त्यांचा मोठेपणा होता. याचा गैरफायदा मी नाही घेतला. मी त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवला. त्यांच्या कामावरती विश्वास ठेवला. सगळ्यांनी मिळून मिसळून आम्ही छान प्रोजेक्ट केला.
9) इंडस्ट्रीत वावरताना लोक प्रवीण तरडेची पत्नी अशी ओळख सांगत असतील. तर स्वतःची ओळख मिळवायची धडपड असते का?
प्रवीणची बायको म्हणून मला ओळखतात हे मला आवडतं. स्वतंत्र अभिनेत्री म्हणून मला आता लोक ओळखतात तेही छान वाटतं. अशी मी तुलना नाही करत. उद्या मला मुलाच्या नावाने ओळखलं तर तेही आवडेल मला. सगळ्याच ओळखी मला आनंद देतात. मला दुःख काहीच होत नाही.
10) तुमचा मुलगा धर्मवीरच्या पहिल्या भागात अभिनय करताना दिसलेला. तर भविष्यात त्याची आवड काय?
तो अजून लहान आहे. त्याची आवड त्याला कळली नाहीय. आम्ही आई-वडील म्हणून जेवढे चांगले संस्कार त्याला देता येतील तेवढा देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आम्ही यशस्वी होऊ की नाही हे येणारा काळच ठरवेल. पालक म्हणजे मुलाचे मालक नसतात. पालक हे मुल जन्माला घालण्याचे माध्यम आहेत. बाकी जेवढे चांगले विचार, संस्कार देता येतील तेवढे देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
11) धर्मवीरच्या पहिल्या भागात मुलाला अभिनय करण्यासाठी कसं तयार केलं?
आता मला बघताना असं वाटतं की त्याला अभिनयापेक्षा टेक्निकल बाजूत जास्त रस असावा. आमचे सिनेमॅटोग्राफर महेश लिमये जे आहेत तर त्यांच्याबरोबर तो सेटवर जास्त रमला. अभिनयाच्या इथे त्याला थोडंसं convience करावं लागलं की ये रे, कर कर, खूप मस्त करतोय. पण त्याने चांगलं केलं. जेवढं सांगितलं तेवढं केलं. त्याने चांगलं केलं.
12) या क्षेत्रात येण्यासाठी महिलांना काय मार्गदर्शन करशील?
मी फक्त एवढंच सांगेन खूप कष्ट करण्याची तयारी ठेवा. खूुप वेळ देण्याची तयारी ठेवा. वाईट माणसं प्रत्येक क्षेत्रात असतात. या क्षेत्राच्या बातम्या जास्त जगभरात पोहोचतात म्हणून कळतं की इथे खूप वाईट माणसं आहेत. पण तसं नाहीय. वाईट माणसं सगळ्याच क्षेत्रात आहेत. तर अशा माणसांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या कामावर, तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या. इतर गोष्टींमध्ये कमी गुंता.
13) आता आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत?
असं ठरलेलं नाहीय काही. खूप काम काम काम, पैसा पैसा पैसा अशी माझी वृत्ती नाही. माझा अभ्यास चालू असतो. जो कायम चालू राहणार. जेव्हा जेव्हा परमेश्वर मला काहीतरी काम करण्याची संधी देईल त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा मी विचार करेन.