पीके - निखळ मनोरंजन
By Admin | Published: December 20, 2014 12:22 PM2014-12-20T12:22:10+5:302014-12-20T12:25:55+5:30
'पीके' या चित्रपटाकडून सगळ्यांनाच प्रचंड अपेक्षा होत्या. त्या खर्या करत ‘पीके’ने मनोरंजनाचा पुरेपूर निखळ आनंद दिला आहे.
- हिंदी चित्रपट : अनुज अलंकार
‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर निर्माता विधु विनोद चोप्रा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि आमीर खान यांची टीम पुन्हा ‘पीके’ चित्रपटात एकत्र आली आहे. या चित्रपटाकडून सगळ्यांनाच प्रचंड अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा खर्या करत ‘पीके’ने मनोरंजनाचा पुरेपूर निखळ आनंद दिला आहे. हिरानींच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटाने समाजातल्या सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा मागोवा घेत संदेशही दिला आहे.
ही कथा आहे एलियन पीकेची (आमीर खान). परग्रहावरून पृथ्वीवरच्या लोकांच्या जीवनशैलीचा शोध घेण्यासाठी पीकेला पृथ्वीवर पाठवले जाते. त्यासाठी राजस्थानच्या मरूस्थळ येथे तो अवतार घेतो. त्यानंतर त्याचे लॉकेट गायब होते. परग्रहावर परतण्यासाठी यानाला संकेत देण्याचे काम त्या लॉकेटमधल्या शक्तीमुळे त्याला करता येणार असते. पण शोध घेऊनही ते सापडत नाही. राजस्थानमधल्या छोट्याश्या गावात तो दैनंदिन जीवनातले धडे आपल्या शैलीने शिकतो. तिथे त्याची भेट बँडमास्टर भैरो सिंहशी (संजय दत्त) शी होते. दोघे मित्र बनतात. भैरोच्या मदतीने पीके आपल्या लॉकेटचा शोध घेण्यासाठी दिल्लीला येतो. त्यासाठी मंदिरापासून सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांवर जाऊन बघतो. त्याच्या स्वभावामुळे सर्व त्याला पी म्हणून हाक मारायला लागतात. दरम्यान, दिल्लीतल्या एका वृत्त वाहिनीत काम करणार्या पत्रकार जगत जननी ऊर्फ जग्गूशी (अनुष्का शर्मा) पीकेची भेट होते. पीकेत टीआरपीसाठीचा मसाला असल्याचे जग्गूला वाटते. याचदरम्यान जग्गूला पीके एलियन असल्याचे कळते. सुरुवातीला तिचा यावर विश्वास बसत नाही. पण सत्य समजल्यावर मात्र ती पीकेला मदत करण्यास तयार होते. पीकेचे ते लॉकेट धार्मिक गुरू (सौरभ शुक्ला)कडे असते. त्याद्वारे तो लोकांच्या समस्या सोडवतो. तसेच मंदिर बांधण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा करतो. धर्माच्या नावाखाली लोकांची आस्था आणि संवेदनांचा जो बाजार धार्मिक गुरू मांडतो त्याविरोधात पीके आवाज उठवतो. त्याचबरोबर आपण देवाचा अवतार असल्याचे सांगत लोकांना फसवणार्यांचे सत्य उघडकीस आणण्याचे कामही तो आपल्या शैलीत करतो. याचदरम्यान पीके जग्गूच्या प्रेमात पडतो. पण बेल्जियमला असताना जग्गू आणि सरफराज (सुशांत सिंह राजपूत) यांचे प्रेम असते. काही गैरसमजुतींमुळे त्यांचे संबंध संपुष्टात येतात. तसेच सरफराज सध्या पाकिस्तानात असल्याचेही पीकेला कळते. पृथ्वीतलावरच्या अनेक गोष्टी समजून घेत पीके परग्रहात जाण्याआधी जग्गू आणि सरफराज यांनाही एकत्र आणतो.
वैशिष्ट्ये : आपल्या चित्रपटातल्या साध्या भूमिकाही कशा उंचावर न्यायच्या आणि त्याचबरोबर समाजालाही नकळतपणे संदेश द्यायचा हे राजकुमार हिरानींना चांगले जमते. हिरानींनी या वेळी देशात धर्माच्या नावाने लोकांच्या भावनांचा जो खेळ सुरू आहे, असा संवेदनशील विषय कथेसाठी निवडलाच, पण त्यातून योग्य संदेश देण्यातही ते यशस्वी ठरले आहेत. देवाच्या नावाखाली होणार्या बुवाबाजीचे ते दर्शन घडवतात. हे दर्शन घडवताना हिरानींनी आपल्या जुन्या चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटात हलकीफुलकी मनोरंजक कथा निवडून तिचा उत्कृष्ट वापर केला. यामुळेच पीके खर्या अर्थाने मनोरंजनाबरोबरच समाजाला संदेश देणारा परिपूर्ण चित्रपट आहे. आमीर खानने तर पीकेची भूमिका अक्षरक्ष: जगली आहे. आमीरच्या करिअरमधील ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भूमिका असून त्याच्याव्यतिरिक्त ती कोणीच पेलू शकले नसते हेही तितकचे खरे. तर जगत जननीच्या भूमिकेला अनुष्का शर्मानेही संपूर्ण न्याय दिला आहे. छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेत संजय दत्त, सुशांत सिंह यांनी तर साहाय्यक भूमिकांमध्ये परिक्षीत साहनी, सौरभ शुक्ला, बोमन इराणींनी छाप पाडली.
शांतनू मोइत्राची गाणी चांगली जमली आहेत. ठर्की छोकरे गाण्यात संजय दत्त- आमीरचे नृत्य मजा आणते. अभिजात जोशीबरोबर राजकुमार हिरानी यांनी चांगले संवाद लिहिले आहेत. दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिरानींनी प्रभाव पाडला आहे.
उणिवा - उत्तरार्धात धर्मावर भाष्य करण्यात खूप जास्त वेळ गेल्यामुळे चित्रपट थोडा गडबडतो. पण नंतर मात्र त्याने चांगला वेग पकडलाय.
का पाहावा: मनोरंजनाने भरलेला चित्रपट, आमीरचा सर्वांगसुंदर अभिनय.
का पाहू नये : काहीच कारण नाही.
- मनोरंजनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते सगळे ‘पीके’त ठासून भरले आहे. मनोरंजनाबरोबरच योग्य संदेश देण्यात ‘पीके’ची टीम यशस्वी ठरली आहे.