'कळस' भटकंतीचा, प्रदीर्घ भटकंतीनंतर 'कळस'च्या चित्रीकरणासाठी सापडले ठिकाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:04 PM2018-12-20T12:04:29+5:302018-12-20T12:12:07+5:30
काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित 'कळस' चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे.
काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित 'कळस' चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे. या चित्रपटाची कथा १९८३ ते १९८५च्या काळात घडणारी असल्यामुळे या कथेनुसार प्राचीन मंदिर हवे होते. त्यासाठी या सिनेमाचे दिग्दर्शक रोहन सातघरे, कॅमेरामन योगेश अंधारे, लेखक आशिष निनगुरकर,कार्यकारी निर्माते प्रतिश सोनवणे,कलादिग्दर्शक गिरीश कोळपकर व क्रिएटिव्ह हेड सिद्धेश दळवी यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
'कळस' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रातील प्राचीन अशा अनेक मंदिरांना भेटी देवून दर्शन घेतले. देवगड, रत्नागिरी, चिपळूण, नाशिक, पुणे, भोर, नाशिक, सातारा, वाई, कोल्हापूर, नागपूर, सासवड, चिंचवड, नांदेड, अमरावती, औरंगाबाद व अशा अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी या जुन्या मंदिरांचा इतिहास समजून घेतला. काही मंदिरे पांडवकालीन होती तर काही मंदिरे पेशवेकालीन होती तर काही मंदिरामध्ये आत्ताच्या काळानुसार नवीन बांधकाम व नव्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. पण या सिनेमातून गोष्टीला साजेसे आणि योग्य मंदिर समर्पक लोकेशन मिळावे यासाठी संपूर्ण टीम आग्रही होती. त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि अतोनात भटकंती केली. त्यातून त्यांना या सिनेमासाठी हवे ते लोकेशन मिळाले. हे लोकेशन पाहून दिग्दर्शक रोहन सातघरे,कॅमेरामन योगेश अंधारे, लेखक आशिष निनगुरकर,कार्यकारी निर्माते प्रतिश सोनवणे,कलादिग्दर्शक गिरीश कोळपकर यांना खूप आनंद झाला. हे लोकेशन अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील असून 'कळस' या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग या परिसरात होणार असल्याची माहिती सहाय्यक निर्माते सुनील जाधव यांनी दिली.
'कळस' या चित्रपटाच्या निमित्ताने या टीमने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. या सिनेमात आपल्याला उत्तमोत्तम लोकेशन बघायला मिळतील यात शंका नाही. या सिनेमाची कथा व कलाकार कोण असणार आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.