चाकोरीबाहेरील भूमिका करायला आवडतात
By Admin | Published: April 16, 2017 03:17 AM2017-04-16T03:17:12+5:302017-04-16T03:17:12+5:30
छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांनी रसिकांवर मोहिनी घातलेली अभिनेत्री कृतिका कामराला नेहमीच रसिकांनी भरभरून प्रेम दिले. आता चंद्रकांता
छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांनी रसिकांवर मोहिनी घातलेली अभिनेत्री कृतिका कामराला नेहमीच रसिकांनी भरभरून प्रेम दिले. आता चंद्रकांता या भूमिकेच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. छोटा पडदा ते शॉर्टफिल्ममध्ये तिने वैविध्य भूमिका साकारल्या आहेत. दोन्ही ठिकाणी नशीब आजमवल्यानंतर आता कृतिकाला रुपेरी पडदा खुणावू लागला आहे. याच प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी कृतिका कामराशी साधलेला हा संवाद.
चंद्रकांता ही मालिका कशी मिळाली?
- खरं सांगायचं, तर ही गोष्ट इतकी अनपेक्षित आणि योगायोगाने घडली आहे, की माझ्या दृष्टीने ती परिकथाच बनली आहे. प्रत्येक मुलीलाच आपण राजकन्या व्हावंसं वाटत असतं. मलाही लहानपणापासून राजकन्या व्हावंसं वाटत होतं. त्यामुळे निर्माते जेव्हा माझ्याकडे राजकन्या चंद्रकांताची भूमिका घेऊन आले, तेव्हा मला माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचा भास झाला. कारण राजकन्येची भूमिका म्हणजे सुंदर आणि भारी पोशाख आणि छान दिसणं हे ओघाने आलंच. या भूमिकेमुळे माझ्यातील अभिनयगुणांना व्यक्त होण्याची संधी मिळणार होती. त्यामळे या भूमिकेला नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हताच.
१९९४ साली आलेल्या शीखा स्वरूप यांच्या ‘चंद्रकांता’ मालिकेतील भूमिकेशी तुझी तुलना होईल, असे वाटले होते का?
- चंद्रकांता मालिकेशी रसिकांच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा ते या नवीन ढंगातील चंद्रकांताला पाहतील, तेव्हा नक्कीच त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल. शीखा स्वरूप यांनी साकारलेल्या चंद्रकांताशी माझी तुलनाही रसिक करतील. मात्र मला कोणाचीच कॉपी करायची नाहीय. ज्याप्रमाणे आजही शीखा स्वरूप रसिकांच्या मनात आहेत, त्याचप्रमाणे माझीही भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरावी, याचा मी प्रयत्न करणार आहे. पूर्वीच्या चंद्रकांता मालिकेबद्दल माझ्याही काही सुखद आठवणी आहेत. या मालिकेतील राजकन्येची भूमिका आव्हानात्मक वाटल्याने मी ती स्वीकारली आहे. मी यापूर्वी कधी ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिकांमध्ये भूमिका केलेल्या नाहीत, त्यामुळे ही भूमिका स्वीकारणे माझ्यासाठी एक नवे आव्हान होते.
यापूर्वी रसिकांनी तुला एक पत्रकार म्हणून पाहिलं होतं. तुझ्या वैविध्यपूर्ण भूमिकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल?
- यापूर्वी मी एका डॉक्टरची, नोकरी करणा-या मुलीची आणि पत्रकाराची भूमिका साकारली होती. मी ज्या ज्या भूमिका साकारल्या, त्यात त्यांची साचेबद्ध प्रतिमा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. मला जगाला काही सिद्ध करून दाखवायचं नसून स्वत:साठी भूमिका जगायला आवडतात.मी कोणतंही आव्हान पेलू शकते. मला चाकोरीबाहेरील भूमिका करायला आवडतात. वेगवेगळ्या माध्यमांवर वेगवेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून माझी ओळख निर्माण करायची आहे.
टीव्ही मालिकांमध्ये तोच तो पणा पाहायला मिळत आहे.त्यात खरेच नाविण्य पाहायला मिळते असे तुला वाटते का?
- मुळात टीव्ही मालिकांमध्ये सासू-सुनेच्या, ऐतिहासिक, पौराणिक, काल्पनिक आणि फॅण्टसी यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांना नक्कीच जागा आहे. दुर्दैवाने आपण एखादा ट्रेण्ड धरून त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करीत राहतो. पण ही मानसिकता मोडून काढणाऱ्या एका मालिकेत मला काम करायला आवडेल. अशी मालिका लोकप्रिय होईल की नाही, हा अगदी वेगळा मुद्दा आहे;परंतु कलाकराने सतत नवीन काहीतरी करत राहणे गरजेचे आहे.आगामी काळात तसाचा प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाहीय याविषयी तुझं काय मत आहे?
- महिलांकडे लैंगिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं, ही गोष्ट खरी आहे. समाजात विविध ठिकाणी अशा घटना आजही पाहायला मिळतात. पण काही कामं अशी असतात, की तिथे एखाद्या महिलेला आकर्षक दिसणं अपेक्षित असतं. तो तिच्या कामाचाच एक भाग असतो.त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.
आगामी काळात तुझे रुपेरी पडद्यावर झळकण्याचे काही प्लॅनिंग आहेत का?
- सध्या असे काही प्लॅनिंग नसून शॉर्टफिल्मच्या काही आॅफर्स आल्या होत्या. त्या मी स्वीकारल्या. त्यातलीच व्हाइट शर्ट, गर्ल फ्रेंड या शॉर्टफिल्मला चांगलाच प्रतिसाद मिळाला. नक्कीच इतरांप्रमाणे सिनेमातही झळकण्याची इच्छा आहे.