ह्रतिकने बोगस मेल आयडीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कंगनाला बजावला समन्स
By Admin | Published: March 31, 2016 01:29 PM2016-03-31T13:29:40+5:302016-03-31T14:07:38+5:30
ह्रतिकने तक्रारीत कंगना राणावतचं नाव दिलं असल्याने पोलिसांनी कंगनाला समन्स बजावून जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३१ - अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार करण्यात आला असून त्याच्या चाहत्यांसोबत या ईमेल आयडीद्वारे संपर्क साधला जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. ह्रितिकने दिलेल्या तक्रारीत ही व्यक्ती माझ्या नावे मेल आयडीद्वारे कंगना राणावतशीदेखील संपर्क साधत होती अशी माहिती दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ह्रितिकने तक्रारीत कंगना राणावतचं नाव दिलं असल्याने पोलिसांनी कंगनाला समन्स बजावून जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं आहे. तक्रार करण्यासाठी ह्रितिक रोशन आपल्या वकिलासोबत स्वत: पोलीस ठाण्यात हजर होता अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. hroshan@email.com असा मेल आयडी तयार करण्यात आला असून याचा आपल्याशी काही संबंध नसल्याचं ह्रितिकने सांगितलं आहे.
ह्रितिक रोशनने दिलेल्या तक्रारीत बोगस मेल आयडी तयार केलेल्या व्यक्तीशी कंगना राणावत मेलद्वारे संपर्कात होती अशी माहिती दिली आहे. ईमेल्स प्रक्षोभक असल्याने तसंच कंगनाला लोकांपासून आणि मिडियापासून लांब ठेवण्यासाठी ह्रितिक रोशन कंगनाचे नाव समोर आणू इच्छित नव्हता. मात्र अखेर त्याने कंगनाचं नाव पोलीस तक्रारीत दिलं आहे. पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोली यांना समन्स पाठवला असून दोघींना एका आठवड्यात पोलीस ठाण्यात हजर राहून आपला जबाब नोंदवायचा आहे.