ट्रॅफिक रूल मोडणा-या अदिती राव हैदरीला पोलिसांनी अडवलं
By Admin | Published: May 17, 2016 03:04 PM2016-05-17T15:04:02+5:302016-05-17T15:09:33+5:30
अभिनेत्री अदिती राव हैदरी नोएडामधील मॉलमध्ये कार्यक्रमाला जात असताना ड्रायव्हरने चुकीच्या लेनमध्ये गाडी घातल्यामुळे नोएडा पोलिसांनी गाडी अडवली होती
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 17 - अभिनेत्री अदिती राव हैदरी नोएडामधील मॉलमध्ये कार्यक्रमाला जात असताना पोलिसांनी अडवलं होतं. मॉलमध्ये लवकर पोहोचण्याच्या नादात अदिती राव हैदरीच्या ड्रायव्हरने चुकीच्या लेनमध्ये गाडी घातल्यामुळे नोएडा पोलिसांनी गाडी अडवली होती. शॉर्टकट घेण्याच्या नादात ड्रायव्हरने चुकीच्या लेनमध्ये गाडी घुसवल्याने पोलिसांनी कारवाई केली. अदिती राव हैदरीच्या सेलिब्रेटी स्टेटसचा फायदा घेण्याचा ड्रायव्हरने प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई करत कागदपत्र जप्त केली.
'सेंटर स्टेज मॉल टी पॉईंटजवळ कारने चुकीचे वळण घेतलं. त्यांनी सरळ जाणे अपेक्षित होतं मात्र ड्रायव्हरने शॉर्टकट घेतला. मी गाडी थांबवून ड्रायव्हरला परवाना दाखवण्यास सांगितलं तेव्हा गाडीतील लोक बाहेर आले आणि 'सेलिब्रेटी आहे सोडून द्या 10 -12 हजार रुपये घ्या आणि जाऊ द्या', अशी विनवणी करु लागले. पण मी पावती फाडावी लागेल आणि त्यासाठी फक्त 700 रुपयांचा दंड भरावा लागेल, तुम्ही जास्त पैसे का देत आहात', असं विचारल्याचं वाहतूक निरीक्षक धर्मेंद्र यादव यांनी सांगितलं आहे.
त्यानंतर अदिती राव हैदरी आपल्या टीमसोबत तेथून चालत गेली. 'गाडी अडवल्यानंतर डीएलएफ मॉलच्या मॅनेजमेंटलाही फोन करण्यात आला होता. त्यांनीदेखील गाडी सोडून देण्याची विनंती केली. अदितीला 6 नंबर गेटवर जायचं होतं त्यासाठी ड्रायव्हरने चुकीचं वळण घेतलं. अदिती आपल्या टीमसोबत चालत मॉलकडे गेली. त्यानंतर ड्रायव्हरची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. अदिती सेलिब्रेटी असल्याचं मला माहिती नव्हतं. मी तिला ओळखत नाही', असं धर्मेंद्र यादव यांनी सांगितलं आहे.
अदिती राव हैदरीने प्रतिक्रिया देत नोएडा सुंदर शहर असल्याचं म्हटलं आहे. येथील रस्ते मोठे आहेत पण वाहतुकीची समस्या खुप मोठी आहे. यावर लवकरच काहीतरी उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.