‘पोरगं मजेतय’ची या चित्रपट महोत्सवासाठी झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:21 PM2021-03-06T16:21:36+5:302021-03-06T16:22:36+5:30
‘पोरगं मजेतय’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय दिग्दर्शक मकरंद माने यांनी ‘रिंगण’,‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून आजवर मराठी रुपेरी पडद्यावर आणले. उत्तम कथाविषय आणि तितकेच उत्तम कलाकार-तंत्रज्ञ यांची सांगड घालून मकरंद माने पुन्हा एका नव्या कलाकृतीसह सज्ज झाले आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला ‘पोरगं मजेतय’ हा त्यांचा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मधील मराठी चित्रपट विभागामध्ये या चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मानवी भावभावना, नातेसंबंध याविषयीच्या कुतूहलातून त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांना अधोरेखित करणारे अनेक चित्रपट आजवर रुपेरी पडद्यावर आले आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून साधला आहे.
आपल्या अवतीभवती घडणारी अगदी साधी, सोपी सरळ गोष्ट तेवढ्याच प्रभावीपणे दिग्दर्शकाने मांडली आहे. बाप लेकाच्या नात्याचा हा भावनिक प्रवास प्रत्येकालाच समृद्ध करणारा अनुभव असेल, असा विश्वास राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक मकरंद माने व्यक्त करतात.
‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. रंगभूषा संतोष डोंगरे, नृत्यदिग्दर्शन मकरंद माने व विश्वास नाटेकर यांचे आहे. कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. प्रोडक्शन हेड मंगेश जगताप आहेत. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत.