‘मायकल जॅक्सनकडून मिळते डान्सची ऊर्जा’

By Admin | Published: July 10, 2017 02:50 AM2017-07-10T02:50:32+5:302017-07-10T02:50:32+5:30

अभिनेता टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

'The Power Of Dance From The Michael Jackson' | ‘मायकल जॅक्सनकडून मिळते डान्सची ऊर्जा’

‘मायकल जॅक्सनकडून मिळते डान्सची ऊर्जा’

googlenewsNext

-Suvarna Jain
अभिनेता टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात टायगरसह अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा झळकणार आहे. उत्तम डान्सर असलेल्या टायगरच्या डान्सची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने टायगरशी साधलेला हा संवाद...
‘मुन्ना मायकल’ सब्बीर खान यांच्यासह तिसरा सिनेमा, काय भावना आहेत?
- सब्बीर खानसोबत माझं एक वेगळंच ट्युनिंग आहे. माझ्या करिअरला दिशा देण्यात आणि ते घडवण्यात ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचा हात आहे, त्यापैकी एक म्हणजे सब्बीर असं मी मानतो. ‘बागी’ सिनेमाचं शूटिंग पूर्णही झालं नव्हतं. त्याचवेळी सब्बीरने मला ‘मुन्ना मायकल’ सिनेमा आॅफर केला होता.

मायकल जॅक्सनचं निधन झालं त्यावेळी तू कसा रिअ‍ॅक्ट झालास?
- ‘मुन्ना मायकल’ करण्याचे पहिले कारण मायकल जॅक्सनच होते. हा सिनेमा म्हणजे माझा आवडता हीरो मायकल जॅक्सनसाठी एक श्रद्धांजली असल्याने मला त्याचा खूप आनंद आहे. मायकल जॅक्सनचे जाणे माझ्यासाठी हा मोठा आघात आणि धक्का होता. मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की, मायकल जॅक्सन अमर आहे. त्याने कधीही त्याच्याकडे असणाऱ्या सामर्थ्याचा आणि शक्तीचा गैरवापर केला नाही. त्याच्याकडून प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळत असे.

तुझ्यावर मायकलचा किती प्रभाव पडला आहे? अजूनही तू त्याची गाणी ऐकतोस?
- हो नक्कीच... मी अजूनही ऐकतो आजही त्याची गाणी.. जेव्हा मी लहान होतो त्यावेळी मी स्वत:ला माझ्या खोलीत कोंडून घ्यायचो आणि त्या बंद खोलीत मायकलच्या गाण्यावर त्याच्याप्रमाणे डान्स करायचो. मला ते आवडायचं. मी खूप लाजाळू होतो. त्यामुळे बालपणी कधीही सगळ्यांसमोर डान्स केला नाही. मायकलला मी इतकं फॉलो करतो हे कदाचित त्या वेळी माझ्या आई-वडिलांनाही माहीत नसावं.

‘मुन्ना मायकल’ हा सिनेमा मायकल जॅक्सनला समर्पित आहे. तसंच त्यात तुझ्या वडिलांना म्हणजेच जॅकी श्रॉफ यांना सलाम करण्यात आलाय.. काय सांगशील?
- मुन्ना मायकल हा सिनेमा माझ्या वडिलांना आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा एक प्रयत्न आहे. तीन बत्ती या ठिकाणी मुन्ना मायकलचं शूटिंग पार पडलं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी माझे वडील याच ठिकाणी राहत होते. ते पाहून मी अक्षरक्ष: भारावून गेलो होतो. माझ्या वडिलांचं त्यांच्या कामावर अतिशय प्रेम होतं आणि ते कायम राहील. सेटवर त्यांचे प्रत्येकाशी चांगले संबंध होते. त्यामुळेच प्रत्येकाचे ते प्रिय आहेत. रसिकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात आणि याचा मला खूप अभिमान आहे. चित्रपटसृष्टीत इतकी वर्ष वावरताना, काम केलेलं असताना ते कायम नम्र राहिले आणि आजही तो नम्रपणा कायम असून, पाय अजूनही जमिनीवरच आहेत.
नवाजुद्दीनसह काम करण्याचा अनुभव कसा होता. त्यात
तू त्याला डान्सही शिकवला आहेस. त्याविषयी कसा अनुभव होता?
- नवाजुद्दीन एक जबरदस्त कलाकार आहे. प्रत्येक सीन करताना नवाजुद्दीनमध्ये एक नवा उत्साह आणि नवा जोश असतो. एखादा सीन करताना तो अशी काही अनपेक्षित प्रतिक्रिया देतो की, तुम्ही क्षणभर विचारात पडता. तो मुद्दामहून तशी प्रतिक्रिया देत नसला, तरी त्यामुळे एखादा सीन चांगला होण्यासाठी त्याचा फायदाच होतो. ‘मुन्ना मायकल’मध्ये नवाजुद्दीन माझ्यासह थिरकला आहे. त्याचा माझ्यासोबतचा हा डान्स नक्कीच पाहण्यासारखा आहे. डान्सबाबत सुरुवातीला तो काहीसा साशंक होता; मात्र एकदा कॅमेरा सुरू झाल्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. सगळ्या डान्स स्टेप्स त्याने खुबीने आणि परफेक्टपणे केल्या. त्याचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत.

निधी अग्रवाल हिचा ‘मुन्ना मायकल’ हा पहिला सिनेमा. तर तिच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता. तसंच तिच्यासोबत रिटेक घ्यावे लागले, त्यावेळी तुझा संयम ढळायचा का?
- तिच्यासोबत कामाचा अनुभव झक्कास होता. ती कामात प्रामाणिक आणि मेहनती आहे असं मला वाटते. रिटेकचं म्हणाल तर तिच्या भावना माझ्यापेक्षा दुसरं कोण जाणू शकेल. कारण, काही दिवसांपूर्वी मीसुद्धा तिच्याप्रमाणे नवखा होतो.
रसिकांना किती रिटेक घेतले गेले याच्याशी काही देणं घेणं नसतं. सिनेमागृहात त्यांना रूपेरी पडद्यावर दिसणारा अंतिम सीन सगळ्यात महत्त्वाचा असतो.

अ‍ॅक्शन सिनेमा हा तुझा आवडीचा प्रांत, तर अ‍ॅक्शन हिरोमध्ये तुझा फेव्हरेट कोण?
- अ‍ॅक्शनचा खरा हिरो ब्रुस ली. अ‍ॅक्शनची खरी सुरुवात ब्रुसने केली. दुसरा अ‍ॅक्शनचा बादशाह म्हणजे जॅकी चॅन. सौम्य व्यक्तिमत्त्व असलं तरी तो तितकाच प्रेरणादायी होता.

डान्स हा तुझा आवडता प्रांत आहे. तुझ्या मते बॉलिवूडमध्ये बेस्ट डान्सर कोण आहे असं तुला वाटतं?
- हृतिक रोशन हा सगळ्यात बेस्ट डान्सर आहे असं मला वाटते. शाहिद कपूरचाही डान्स मला भावतो.

मुन्ना मायकलनंतर पुढे काय ?
- मुन्ना मायकल सिनेमानंतर ‘स्टुडन्ट आॅफ द इयर -२’ आणि ‘बागी २’ हे सिनेमा करणार आहे. त्यासाठी एक्साईटेड आहे.

Web Title: 'The Power Of Dance From The Michael Jackson'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.