‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांना ‘जोर का झटका’, प्रभासने रातोरात वाढवलं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 05:30 PM2022-06-26T17:30:01+5:302022-06-26T17:31:43+5:30
Prabhas : सलग दोन फ्लॉपनंतरही प्रभासने वाढवलं मानधन, आता एका सिनेमासाठी घेणार इतकी रक्कम
साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas ) म्हणजे तरूणाईच्या गळ्यातील ताईत. ‘बाहुबली’ सीरिजनंतर प्रभास देशविदेशात लोकप्रिय झाला. अद्यापही त्याची क्रेझ कायम आहे. प्रेक्षक त्याच्यावर फिदा आहेत. साहजिकच प्रत्येक निर्माता प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहे. अगदी प्रभास म्हणेल तेवढी फी देण्यास निर्माते राजी आहेत. म्हणायला, प्रभासचे ‘बाहुबली 2’नंतर आलेले दोन्ही सिनेमे दणकून आपटले. सर्वप्रथम ‘साहो’ फ्लॉप झाला. पाठोपाठ अलीकडे रिलीज झालेला ‘राधेश्याम’ या सिनेमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण तरिही प्रभासची डिमांड कमी झालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने त्याच्या सध्याच्या मानधनामध्ये जवळपास 25 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांकडे 20 कोटी रुपये अतिरिक्त मागितले आहेत. या चित्रपटासाठी तो आधीच 100 कोटी रुपये घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता त्याने निर्मात्यांना यापेक्षा अधिक म्हणजेच 120 ते 125 कोटींची मागणी केली आहे. या बातमीत किती तथ्य आहे, हे माहित नाही. कारण प्रभासने अधिकृतरित्या याबद्दल काहीही सांगितलेलं नाही.
प्रभास हा आपल्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभू श्री रामाची भूमिका साकारणार आहे.500 कोटींचा बजेट असलेल्या या सिनेमात त्याच्यासोबत क्रिती सॅनन झळकणार आहे. सैफ अली खानही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
‘स्पिरिट’साठी घेतले 150 कोटी
प्रभासने अर्जुन रेड्डी फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा एक सिनेमाही साईन केला आहे. या चित्रपटाचं नाव ‘स्परिट’असल्याचं कळतंय. या चित्रपटासाठी प्रभासने किती फी घेतली माहितीये? तर 150 कोटी.
प्रभासचा ‘स्पिरिट’ हा सिनेमा हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, जपानी व कोरियाई भाषेतही रिलीज होणार आहे.प्रभास सध्या ‘सालार’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.