इंजिनिअर अभिनेत्री! प्राजक्ता गायकवाडला मिळाला फर्स्ट क्लास, अभिनयासोबतच शिक्षणही पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:51 PM2023-07-21T15:51:16+5:302023-07-21T15:54:08+5:30
प्राजक्ता अभिनयासोबतच शिक्षण पूर्ण करण्यावरही लक्ष देत होती.
मनोरंजनसृष्टीत काम करत असताना हातात एकतरी डिग्री असू दे असं अनेक कलाकारांना त्यांच्या कुटुंबातून सांगितलं जातं. मनोरंजनक्षेत्र तसं रिस्कीच असल्याने नेहमी कुटुंबीय हा मोलाचा सल्ला देत असतात. टेलिव्हिजन क्षेत्रात यश मिळवून आता या मराठी अभिनेत्रीने नुकतंच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे. ती अभिनेत्री म्हणजे 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड.
प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत ती येसूबाईंची भूमिका साकारत होती. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. प्राजक्ता अभिनयासोबतच शिक्षण पूर्ण करण्यावरही लक्ष देत होती. सेटवर अनेकदा ती अभ्यास करतानाचे फोटो शेअर करायची. तर आता तिच्या या मेहनतीला फळ आलंय. प्राजक्ता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. इतकंच नाही तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने तिने पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या कामगिरीचा कुटुंबाला आणि तिच्या सर्वच चाहत्यांना अभिमान आहे. प्राजक्ताने पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्ससिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. विद्यापीठ परिसरात निळ्या कोटमध्ये फोटो पोस्ट करत प्राजक्ताने ही गुडन्यूज दिली आहे.
प्राजक्ताच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. अनेक चाहते तिचं कौतुक करत आहेत. प्राजक्ताचा मुळातच चाहतावर्ग मोठा आहे. त्यातच आता या बातमीने सर्वच प्राजक्ताच्या आनंदात सहभागी झाले आहेत. 'TCS मध्ये जागा आहेत पटकन अप्लाय कर' अशी मजेशीर कमेंटही एकाने केली आहे.